Big Breaking : राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे गटाचे किती आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात?; सामंत यांनी आकडाच सांगितला
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारी कागद दाखवून शहाणपण करू नये, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्यावरून आता उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राऊत हे जगातील सर्वात शहाणे आहेत. शहाण्यांचे महामेरू आहेत, अशी टीका त्यांनी केली.
रत्नागिरी : खारघरमधील दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खुर्ची जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. शिंदे पदावरून जाणार असल्यामुळेच सुट्टीवर गेल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. चर्चा तर बऱ्याच आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे गटाचे उरलेले आमदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, असा दावा करतानाच उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे किती आमदार आणि राष्ट्रवादीचे किती नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत याचा आकडाच सांगितला आहे.
मविआचे बडे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. उरलेले 13 आमदारही शिंदेंच्या संपर्कात आहेत अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीचे 20 लोकंही शिंदे यांच्या संपर्कात आहेत ही देखील चर्चा आहे. काँग्रेसचे बडे नेते काल महाबळेश्वरला शिंदे यांना भेटले अशीही चर्चा आहे, असा गौप्यस्फोट करतानाच चर्चा भरपूर होऊ शकतात. पण ते सत्यात उतरलं पाहिजे, असं उदय सामंत म्हणाले. ती टीव्ही मराठीशी संवाद साधत होते.
रत्नागिरीत मेडिकल कॉलेज
रत्नागिरी आता “एज्युकेशन हब” बनणार आहे. रत्नागिरीसाठी मेडिकल कॉलेजला केंद्राची मंजुरी मिळाली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांना यामुळे यश आलंय. आता रत्नागिरीमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, डी. फार्म, बी. फार्म, एम. फार्म, स्किल सेंटर, एएनएन महाविद्यालय, जीएनएम महाविद्यालय, मरिन डिप्लोमा, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय आदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलीय.
राऊत जगातील शहाणे
यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर त्यांनी टीका केली. संजय राऊत हे जगातील सगळ्यात शहाणे आणि विद्वान नेते आहेत. त्यांच्या समोर स्पर्धक म्हणून जगात एकही विद्वान शिल्लक राहिला नाही. देशातील सगळ्या विद्वानांचे राऊत हे महामेरू बनलेले आहेत. जगातील विद्वानांपेक्षा राऊत यांना जास्त अक्कल आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली. राऊत यांनी सरकारी कागद दाखवून शहाणपण दाखवू नये अशी टीका सामंत यांच्यावर केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना सामंत यांनी ही टीका केलीय.