चंद्रपूर : जिल्ह्यातील मुल तालुक्यात कोसंबी येथे वाघाच्या हल्ल्यात महिला ठार (Woman Attacked by Tiger) झाल्याची घटना उजेडात आली आहे. स्वतःच्या शेतात काम करणाऱ्या महिलेवर वाघाने हल्ला केला आहे. ग्यानीबाई वासुदेव मोहुर्ले (वय 60) असे मृत महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच मुल पोलीस स्टेशनचे (Mul Police Station) ठाणेदार सुशांतसिंह राजपूत, यांच्यासह वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मूल वनविभाग (Mul Forest Department) घटनेचा अधिक तपास करत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील महाऔष्णिक वीज केंद्रात वाघाच्या हल्ल्यात कामगार ठार झाला होता. तर 12 तासाच्या आत दुर्गापूर गावात बिबट्याच्या हल्ल्यात 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना ताज्या असताना हा तिसरा हल्ला झाल्याने जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्ष टिपेला पोचल्याचे पुढे आले आहे.
दुर्गापूर परिसरात पट्टेदार वाघाने कामगाराला ठार केले. या घटनेला दोन दिवस व्हायचे आहेत. शुक्रवारी सकाळी दुर्गापूर वेकोली परिसरात सोळा वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला. यात तो ठार झाला. या घटनेची चर्चा संपते न संपते तोच लाखोरी तोडण्यासाठी गेलेल्या महिलेला वाघाने संपविले. शुक्रवारी दुपारच्या दरम्यान ही घटना घडली. या तीन्ही घटनांमुळं चंद्रपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांची दहशत निर्माण झाली आहे.
शिवजयंती उत्सव साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू आहे. बिबट्याने गावालगत दर्शन दिल्याने गावात एकाच खळबळ उडाली. ही घटना भंडारा जिल्हाच्या लाखांदूर तालुक्यातील खैरेपट येथे घडली. दोन बछड्यांना घेऊन एक मादा बिबट गेल्या आठ दिवसांपासून खैरेपट परिसरात मुक्त संचार करीत आहे. चार दिवसांपूर्वीच या मादा बिबट्याने खैरेपट येथील धनराज भागडकर यांच्या 36 कोंबड्यांसह एक कुत्रा फस्त केला होता. आज पुन्हा सकाळी खैरेपट मुख्य चौकालगत असलेल्या नाल्याजवळ शौचास गेलेल्या इसमाला बिबट दिसला. त्याने पळ काढीत गावात सूचना दिली. गावात बिबट आल्याची माहिती होताच ग्रामस्थ एकत्रित जमा झाले. दरम्यान बिबट्याने नाल्यातच एका माकडाला मारले. वन कर्मचारी तसेच लाखांदूर पोलीस घटनास्थळी आले. नाल्यातील दाट झुडुपामध्ये बिबट्याने आश्रय घेतला. त्यास बाहेर काढण्यास अडचण निर्माण झाली. दरम्यान, सदर बिबट्याच्या मुक्त संचार असल्याने शेतकरी वर्गात मोठी दहशत पसरली आहे. बिबट्याला पकडून जंगलात सोडावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.