विदर्भात वाघ-वन्यजीव संघर्ष, इतक्या ग्रामस्थांचा मृत्यू, यांनी सांगितली उपाययोजना
ब्रम्हपुरी वनविभागातील पाच वाघांना अन्यत्र स्थलांतरित करण्याचा पहिला प्रयत्न यशस्वी केला आहे.
चंद्रपूर – जिल्ह्यासह विदर्भात मानव-वन्यजीव संघर्ष वाढीस लागला आहे. एकीकडे वाघांची संख्या चंद्रपूर जिल्ह्यात वाढत असताना या वाघांना पुरेसे जंगल उपलब्ध नाही. त्यांची मानव वस्तीकडे वाटचाल होत आहे. विदर्भातील विविध वनव्याप्त क्षेत्रात असलेल्या शेत शिवारात काम करणाऱ्या मजूर व शेतकऱ्यांना वाघाची मोठी भीती निर्माण झाली आहे. परिणामी मानव वन्यजीव संघर्षात चालू वर्षभरात 41 ग्रामस्थांचा मृत्यू झालाय. ही संख्या धक्कादायक आहे.
याच काळात वन विभागाने चार वाघ जेरबंद केलेत. नऊ वाघांचा मृत्यू नोंदविण्यात आला आहे. तीन बिबटेदेखील मृत अवस्थेत आढळले आहेत. दरम्यान, 2014 साली चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या 190 एवढी होती. आता ती पूर्ण वाढीचे वाघ व बछडे मिळून पाचशेच्या घरात गेली आहे.
राज्याच्या वनविभागाने केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाशी सल्लामसलत करण्यात आले. ब्रम्हपुरी वनविभागातील पाच वाघांना अन्यत्र स्थलांतरित करण्याचा पहिला प्रयत्न यशस्वी केला आहे. दरम्यान नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात संघर्षग्रस्त वाघांना ठेवण्यात आले आहे. या संग्रहालयाची क्षमता देखील संपल्याने देशातील अन्य भागात असलेल्या प्राणी संग्रहालयात या वाघांना पाठविण्याबाबत सकारात्मक निर्णय होत आहे.
जंगलावरील नागरिकांची अवलंबिता कमी करून तेंदु बोनस वाढवत मनरेगाच्या माध्यमातून जैविक कुंपणाचा पर्याय शोधत मानव वन्यजीव संघर्षावर उपाययोजना केल्या जात आहेत. या प्रश्नाचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीचे गठन करण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
गेल्या आठ वर्षांत वाघांची संख्या अडीचपट वाढली. त्यामुळं वाघांचा वावर शेतशिवारात होऊ लागला. गावाशेजारी चराईसाठी जाणाऱ्या जनावरांचा बळी वाघ घेऊ लागला. यामुळं गावकरी त्रस्त होत आहे. सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळं त्यांनी याकडं विशेष लक्ष दिलंय