Chandrapur Crime | दोन गांजा तस्करांना अटक, 33 लाखांचा गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
गडचिरोली जिल्ह्यातून चारचाकी वाहनाने चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गांजातस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर दोन पथके गठीत करून गडचिरोली जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांवर पाळत ठेवण्यात आली. परराज्यातून गांजा तस्करी करणा-या दोन गांजा तस्करांना बेड्या ठोकण्यात आल्या.
चंद्रपूर : परराज्यातून गांजा तस्करी करणा-या दोन गांजा तस्करांना बेड्या (Two Cannabis Smugglers Arrested) ठोकण्यात आल्या. 33 लाखांचा गांजा जप्त करीत चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या ( Local Crime Branch) पथकाने मोठी कारवाई केली आहे. शहराच्या सीमेवरील चिचपल्ली गावाजवळ ही कारवाई झाली. यावेळी दोन वाहनेसुद्धा जप्त केली गेली आहेत. श्रीनिवास नरसय्या मिसिडी, शंकर बालय्या घंटा दोघेही राहणार करिमनगर, तेलंगणा अशी अटकेतील गांजा तस्करांची नावे आहेत. तर, अन्य फरार दोन तस्करांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस (Ramnagar Police)ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातून चारचाकी वाहनाने चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गांजातस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर दोन पथके गठीत करून गडचिरोली जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांवर पाळत ठेवण्यात आली.
125 किलो गांजा जप्त
चिचपल्ली गावाजवळ दोन वाहने थांबवून तपासणी केली. त्यात 125 किलो गांजा आढळून आला. या गांजाची किमत 33 लाखांच्या घरात आहे. यावेळी श्रीनिवास नरसय्या मिसिडी, शंकर बालय्या घंटा या दोघांना ताब्यात घेण्यात आले. परंतु, अन्य दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी गांजा, वाहने असा 43 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेची ही सर्वात मोठी कारवाई आहे. त्यामुळे अवैध गांजातस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी दिली.
गांजा तस्करीत शिक्षकाचा सहभाग
या गांजा तस्करी प्रकरणी एका शिक्षकाला अटक करण्यात आली. श्रीनिवास मचेडी असं या शिक्षकाचं नाव आहे. दोन्ही आरोपी हे तेलंगणा राज्यातील आहेत. पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, सचिन गदादे यांच्या नेतृत्वात दोन पथकं तयार करण्यात आली होती. मूल-चंद्रपूर रोडवर चिचपल्ली गावाजवळील शेर-ए-पंजाब धाब्याजवळ पळत ठेवण्यात आली होती. होंडा सिटी व मारुती स्विफ्ट या दोन गाड्या थांबविण्यात आल्या. दोन्ही वाहनांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.