चंद्रपुराच्या पावसाची भीषणता, कुठे नदीत जोडप्याचा मृतदेह, तर कुठे मेंढपाळ दोन दिवस जंगलात अडकला
महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये गेल्या दोन दिवसात प्रचंड मुसळधार पाऊस पडला. रत्नागिरी, रायगड, सांगलीसह अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला.
चंद्रपूर : महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये गेल्या दोन दिवसात प्रचंड मुसळधार पाऊस पडला. रत्नागिरी, रायगड, सांगलीसह अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला. अनेक ठिकाणी दरड कोसळून मृत्यूच्या घटना समोर आल्या. कोल्हापुरात तर 2019 ची पुनरावृत्ती व्हावी असा पूर आला. या सगळ्या घटना घडत असताना चंद्रपुरातही गेल्या दोन दिवसात प्रचंड पाऊस पडला. या दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याच्या घटनाही समोर आल्या. दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर पावसाने आज थोडीसी उसंत घेतली. मात्र, यानंतर आता या पावसामुळे झालेलं नुकसान समोर येत आहेत. चंद्रपुरात एक जोडपं पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं समोर आलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पुरात जोडपे बुडाल्याची घटना समोर आली आहे. शहरालगतच्या घुग्गुस जवळ धानोरा-वर्धा नदी पात्रात हे मृतदेह आढळले आहे. नदीपात्राच्या आसपासच्या शेतशिवारात काम करणाऱ्या नागरिकांना सर्वप्रथम हे मृतदेह दिसले. त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. गेले तीन दिवस चंद्रपूर जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे नदी प्रवाहातून हे मृतदेह वाहत आले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अद्याप या दोन मृतदेहांची ओळख पटलेली नाही. घुग्गुस पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मेंढपाळ दोन दिवस जंगलात अडकला
चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जंगलात अडकलेल्या एका मेंढपाळाने तब्बल दोन रात्र जंगलात काढल्याची घटना समोर आली आहे. ब्रम्हय्या उडतलवार असं या 55 वर्षीय मेंढपाळाचं नाव आहे. तो राजुरा तालुक्यातील देवाडा या गावचा रहिवासी आहे. तो बुधवारी (21 जुलै) सकाळी आपल्या मेंढ्या आणि बकऱ्यांना घेऊन जंगलात गेला होता. मात्र दुपारपासून धो-धो पाऊस बरसायला सुरुवात झाली. जंगलातील सर्व नदी-नाले दुथडी भरून वाहायला लागले. त्यामुळे ब्रम्हय्या याला जंगलातून आपल्या गावाकडे परतणे शक्य झाले नाही.
विशेष म्हणजे तब्बल दोन दिवस पाऊस बरसत राहिल्यामुळे या मेंढपाळाला जंगलातून बाहेर पडणे शक्य झाले नाही. मात्र अशा बिकट परिस्थितीत देखील त्याने हिंमत हारली नाही. जंगलात अतिशय धीराने त्याने आपल्या बकऱ्यांसोबत जंगलात दोन दिवस आणि दोन रात्र काढल्या. या पूर्ण काळात त्याच्याकडे खायला काहीही नव्हते. त्याने फक्त शेळीचं दूध पिऊन आपली भूक भागवली.
हेही वाचा : साताऱ्यातील 379 गावे बाधित, 1,324 कुटुंबांचे स्थलांतर, 18 मृत्यू, 24 जण बेपत्ता तर 3,024 जनावरांचा मृत्यू