केंद्रीय पथक पाहणीसाठी दोन महिने लेट, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून बुके आणि घड्याळ भेट!
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात केंद्रीय पथक पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले असता स्थानिक अधिकाऱ्यांनी केंद्रीय पथकाला कोणतीही माहिती न सांगता गडबडीने दौरा आटपण्यासाठी मदत केली.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात केंद्रीय पथक पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले असता स्थानिक अधिकाऱ्यांनी केंद्रीय पथकाला कोणतीही माहिती न सांगता गडबडीने दौरा आटपण्यासाठी मदत केली. केंद्रीय पथकाने अर्ध्या तासाच्या आत पाहणी दौरा आवरला. अगोदरच दोन महिने लेट केंद्रीय पथक पाहणीसाठी आल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष होता. त्यात पथकाने अर्ध्या तासाच्या आत दौरा आवरता घेतला. चिडलेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पथकातील अधिकाऱ्यांना बुके आणि वेळेची आठवण ठेवण्यासाठी घड्याळ भेट दिलं.
स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून बुके आणि घड्याळ भेट!
स्वाभिमानी शेतकरी संघटना केंद्रीय पथकाला बुके व घड्याळ भेट देतावेळी शेतकऱ्यांनी पथकाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण पाहायला मिळालं. जिल्हाधिकारी आणि इतरही अधिकारी केंद्रीय पथकाने कमी वेळात पाहणी करावी, यासाठी आग्रह करत होते.
केंद्रीय पथक पाहणीसाठी दोन महिने लेट
कोल्हापूर जिल्ह्यासह शिरोळ तालुक्याला कृष्णा व पंचगंगा नदीला महापूर परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली होती तसेच शेतकरी व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. राज्य सरकारकडून अजूनही कोणतीही मदत मिळालेली नाही. वास्तविक केंद्रीय पथकानेही लगोलग पाहणी दौरा करायला हवा होता. पण महापूर उलटून दोन महिने झाल्यानंतर केंद्रीय पथक आता पाहणीसाठी आलं.
केंद्रीय पथकाने आज कोल्हापूरसह शिरोळ तालुक्यामध्ये पाहणी केली. पाहणी करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय पथकातील प्रमुखांना दोन महिने लेट म्हणून बुके व घड्याळ देण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले. त्यावेळी तिथे धक्काबुक्की झाली तसंच तणावाचं वातावरण पाहायला मिळालं.
जिल्हाधिकारी आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यातही वाद झाला. केंद्रीय पथक पाहणी करण्यासाठी आले आहे, तुम्हाला बघण्यासाठी आले नाही, असं जिल्हाधिकारी बोलल्याने शेतकरी व प्रशासनामध्ये तणावाचे वातावरण बनले.
केंद्रीय पथकाला शिरोळमध्ये शेतकऱ्यांनी धारेवर धरले तसेच नृरसिंहवाडी मध्ये व्यापाऱ्यांनी प्रश्नाचा भडीमार केला. पुराचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा. अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, असेही निवेदन ग्रामस्थांनी केंद्रीय पथकातील प्रमुखांना दिले. केंद्रीय पथकातील रमेश कुमार, महेंद्र सदाशिव सहारे, पूजा जैन, जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
हे ही वाचा :