‘त्या’ दिवशी पत्रकार परिषदेत भावूक का झालो?; उदयनराजे यांनी सांगितली ‘मन की बात’
खासदार उदयनराजे भोसले यांनी शिव सन्मानासाठी चलो रायगडची हाक दिली आहे. येत्या 3 तारखेला रायगडावर निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सातारा: दोन दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी मेलो असतो तर बरं झालं असतं असं म्हणत उदयनराजे भावूक झाले होते. उदयनराजे यांच्या डोळ्यात पहिल्यांदाच अश्रू पाहिल्याने अनेकजण हेलावून गेले. उदयनराजे का भावूक झाले असा अनेकांना प्रश्नही पडला. त्यावर त्यांनी भाष्य केलं आहे. शिवरायांचा अवमान पाहण्यापेक्षा मेलो असतो तर बरं झालं असतं अशी भावना माझ्या मनात आली. त्यामुळे मी भावुक झालो होतो, असे उदयनराजे यांनी सांगितलं.
खासदार उदयनराजे भोसले यांनी शिव सन्मानासाठी चलो रायगडची हाक दिली आहे. येत्या 3 तारखेला रायगडावर निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सातारा येथील लेक व्ह्यू हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उदयनराजे यांनी त्यांच्या भावूक होण्याचं कारणही सांगितलं.
देव कोणी पाहिला नाही. देवाच्या रुपाने शिवराय प्रकट झाले. ज्यांनी सर्वधर्म धर्मसमभावाची भूमिका मांडली त्यातून स्वराज्याचा जन्म झाला. शिवराय जगाच्या पाठीवर एकमेव राजे आहेत ज्यांनी सर्वांचा सन्मानासाठी आयुष्य वेचले. लोकशाहीचा ढाचा छत्रपतींनी निर्माण केला. महापुरुषांचा अवमान होतं राहिला तर देशाचे तुकडे होतील, असं ते म्हणाले.
जगातील सर्वात मोठी लोकशाही भारतात फक्त शिवाजी महाराज यांच्या विचाराने टिकली आहे. महाराजांनी सामान्यांवर होणाऱ्या अन्यायाला विरोध केला. वेगवेगळ्या पक्ष, संघटना, विचारवंत असे सर्वच जण प्रथम महाराजांचे नाव घेतात. त्यांच्या कार्याला महाराजांचेच विचार दिशा देतात. अशा महापुरुषांच्या विचारांची तोडमोड करण्याचे स्वातंत्र्य या लोकांना कोणी दिलं? असा सवालही त्यांनी केला.
महाराजांच्या विचार प्रत्येकाने आपल्यापुरता घेतला. जातीपुरता घेतला. याचा परिणाम आज आपण एकमेकांकडे जातीपातीवरुन पाहात आहेत. लोक ज्या पद्धतीने बोलतात हे सर्व पाहून ज्या वेदना दुःख होते, ते कोणाला सांगावं?
व्यथा मांडणयासारखा कोण आहे? छत्रपतीचीं समाधी रायगडावर आहे आणि हे सगळं वेदना दुःख रायगडच्या समाधीपुढे मांडण्यासाठी निर्धार सन्मानाचा विचार पुढे आला आहे. तेथे नतमस्तक होऊन हे दुःख आक्रोश मांडण्यासाठी रायगडावर जाणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.
महापुरुषांच्या अवमानाची फॅशन झाली आहे. राज्यपालपदावरील माणसांची हकालपट्टी केली नाही तर हे सर्व अंगवळणी पडेल. हे थांबविण्यासाठी पंतप्रधानांपर्यत निवेदन दिले आहे. अशा अवमानामुळे दंगली घडतील. यासाठी महापुरुषांच्या आवमाना विरोधात कायदा आणला पाहिजे अशी मागणी आहे, असंही ते म्हणाले.