विरारमध्ये आंबेडकर जयंतीच्या उत्सवाला गालबोट, मिरवणुकीनंतर घरी परतत असतानाच अनुयायांना वीजेचा शॉक
आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला विरारमध्ये मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणूक उत्साहात पार पडल्यानंतर सर्व अनुयायी आपल्या घरी परतत होते. मात्र घरी पोहचण्याआधीच या उत्सवाला गालबोट लावणारी घटना घडली.
विरार / विजय गायकवाड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला निघालेली मिरवणूक संपवून अनुयायी घरी चालले होते. यादरम्यान लोखंडी झेंड्याचा पाईप विजेच्या ट्रान्सफार्मरला लागल्याने झालेल्या स्फोटात 7 जण गंभीर भाजले. यात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. यात 3 जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले आहे. विरार पूर्व कारगिल नगर येथे रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण आंबेडकरी जनतेवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, वसई विरार नालासोपाऱ्यात शोकाकुल वातावरण पसरले आहे.
आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला काढली होती मिरवणूक
रुपेश सुर्वे, सुमित अशी मयत झालेल्या भीम अनुयायांची नाव आहेत. स्मित कांबळे, सत्यनारायण पंडित, उमेश कानोजिया, राहुल जगताप, रोहित गायकवाड अशी जखमींची नावं आहेत. बौद्ध जण पंचायत समितीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला विरार पूर्व कारगिल नगरमध्ये बाबासाहेबांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
लोखंडी झेंड्याच्या पाईपचा वीजेच्या ट्रान्सफॉर्मरला स्पर्श लागला
रात्री साडे दहा वाजता मिरवणूक संपल्यानंतर परत जात असताना, बेंजोच्या हात गाड्यावर लावलेला लोखंडी झेंड्याचा रस्त्याच्या बाजूच्या विजेच्या ट्रान्सफॉर्मला स्पर्श झाला. त्यात स्फोट होऊन ही दुर्दैवी घटना घडली. यात जखमींना वसई विरार महापालिकेच्या तुळिंज रुग्णालयात प्रथम दाखल करून, पुढील उपचारासाठी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात नेण्यात आले.