अकोला : वसीम चौधरी (Wasim Chaudhary) यांच्याविरुद्ध रविवारी अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. कलम 354 सह पोस्को व आयटी ॲक्टनुसार (IT Act) गुन्हा नोंदवून सिव्हिल लाईन्स पोलिसांनी वसीम चौधरी यांना अटक केली. चौधरी याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 26 मेपर्यंत पोलीस कोठडी (PCR) दिली आहे. अकोला शहरातल्या तोषणीवल लेआउट येथील कोचिंग क्लासचे संचालक वसीम चौधरी यांच्या विरुद्ध रविवारी सायंकाळी सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीने तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार वसीम चौधरी यांनी मुलीसोबत मोबाईलवरून अश्लील चॅटिंग केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिला खोलीवर बोलावून तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. घाबरलेल्या मुलीने ही बाब पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांसोबत थेट सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशन गाठून वसीम चौधरी विरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. यावेळी पोलीस स्टेशनला मोठ्या मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
पोलिसांनी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून भादंवि कलम 354 (अ,ब,ड) विनयभंग करणे, पोस्को कलम नऊ एफ, 10 अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणे आणि आयटी ॲक्ट कलम सहा, सात (ब) मोबाईलवर अश्लील चॅटिंग करणे आदी गुन्हे दाखल केले. सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी आरोपी वसीम चौधरीला अटक केली आहे.
पुढील तपास सायबर पोलिसांच्या मदतीने सिव्हिल लाईन्स पोलीस करीत आहेत. हे प्रकरण चालविण्यासाठी उज्ज्वल निकम यांची मागणी करणार आहेत. वासीम चौधरी विरोधात आमदार नितीन देशमुख हे गृहमंत्री यांना भेटणार आहेत. अशी माहिती सिव्हिल लाईन्सचे प्रभारी पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी दिली. तर, शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख हे हे प्रकरण चालविण्यासाठी उज्ज्व निकम यांना सरकारी वकील ठेवावे, यासाठी गृहमंत्र्यांना विनंती करणार आहेत.