आम्ही घरात बसून चर्चा करणारे नाही, एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
इंधन कमी लागलं पाहिजे. प्रदूषण कमी झालं पाहिजे. हे सगळं आपण लोकांसाठी करत असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले.
अहमदनगर : दिलेला शब्द पाळण्याची आम्हाला सवय आहे. आम्ही सर्व काम जाहीरपणे करतो. पोटात एक आणि ओटात एक असं आम्हाला जमत नाही. आम्ही घरात बसून चर्चा करणारे नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. शिंदे आणि फडणवीस यांच्या हस्ते या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाले.
शेतकरी पॉझिटीव्ह
स्पीड ब्रेकर दूर केले. रस्त्याच्या महामार्गाचा अडथळा दूर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समृद्धी महामार्गाची माहिती घेतली. हा रस्ता किती महत्त्वाचा आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे ते स्वतः या रस्त्याच्या लोकार्पणासाठी आले. आधी आम्ही जागा देणार नाही, असे शेतकरी होते. आता सर्व शेतकरी पॉझिटीव्ह झाले आहेत.
रस्ता शेतकऱ्यांचे आयुष्यात बदल घडवणारा
समृद्धी शेतकऱ्यांची झाली. कारण जमिनीचा मोबदला मिळाल्यानंतर त्यांनी गाड्या घेतल्या. दुकानं केली. इतर ठिकाणी जमीन घेतली. त्याला इतर शेतकऱ्यांनी समृद्धी नाव दिलं. हा विशेष प्रकल्प आहे. हा रस्ता शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडविणारा रस्ता आहे. अशा रस्त्यांची आवश्यकता आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
समृद्धी महामार्गाने १५ जिल्ह्यांचे भाग्य बदलणार
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, समृद्धीचा तिसरा टप्पा मुंबईपर्यंत जाणार आहे. सहा ते आठ महिन्यांत हा महामार्ग होईल. समृद्धी महामार्गामुळे १५ जिल्ह्यांचे भाग्य बदलणार आहे. विकासासाठी राज्यातील मासाग भाग मुंबईला जोडावा लागणार आहे. महामार्गाच्या भूसंपादनासाठी ठाकरे-पवार यांचा विरोध होता, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अधिवेशनात काही शेतकऱ्यांची बोललो. त्यावेळी ते खूश होते. हा दुसरा टप्पा पुढं नेत आहोत. कुठुनही कुठं माणूस लवकर पोहचला पाहिजे. त्याचा प्रवासाचा वेळ कमी झाला पाहिजे. त्याला त्याचा फायदा झाला पाहिजे. इंधन कमी लागलं पाहिजे. प्रदूषण कमी झालं पाहिजे. हे सगळं आपण लोकांसाठी करत असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले.