वसईत अंधश्रद्धेतून भोंदूबाबाकडून महिलेची लाखो रुपयांची फसवणूक, आरोपी अटकेत
फिर्यादी महिलेचे वसई पूर्व नवघर संत जलाराम बापू नगर येथे रूम नं 1112 मध्ये विजय वडापाव हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये फसवणूक करणारा भोंदू बाबा आणि एक अनोळखी व्यक्ती नियमित येत होते. यातूनच त्यांची ओळख झाली होती.
वसई : माझ्या अंगात कालिका माता येते, सात दिवसाची पूजा करून, घरातील दोष काढून टाकतो असे सांगून एका भोंदूबाबाने वसईत महिलेसह, एका कुटुंबाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. नूर अजीजउल्ला सलमानी असे या भोंदूबाबाचे नाव आहे. याप्रकरणी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केले आहे.
अटकेत असेलला भोंदूबाबा नूर अजीजउल्ला सलमानी हा मीरारोड येथील रहिवासी आहे. एका मध्यस्थाकरवी या भोंदूबाबाची ओळख सदर महिलेशी झाली. आशा प्रजापती असे फसवणूक केलेल्या महिलेचे नाव असून तिचे विजय वडापाव नावाचे हॉटेल आहे. अंगात कालिका माता येते, तुमच्या घरात 7 दिवसाची पूजा घालावी लागेल, तुमच्या घरातील सर्व सोन्या चांदीचे दागिने पूजेला ठेवावे लागतील, असे सांगून भोंदूबाबाने त्यांचा विश्वास संपादन केला.
अशी झाली भोंदूबाबा आणि महिलेची ओळख
फिर्यादी महिलेचे वसई पूर्व नवघर संत जलाराम बापू नगर येथे रूम नं 1112 मध्ये विजय वडापाव हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये फसवणूक करणारा भोंदू बाबा आणि एक अनोळखी व्यक्ती नियमित येत होते. यातूनच त्यांची ओळख झाली होती. याच ओळखीतून अंगात कालिका माता येते, तुम्ही घरात पूजा घाला तुमचे संकट दूर करतो असे भोंदूबाबाने महिलेला सांगितले.
कशी केली फसवणूक?
भोंदूबाबाने 18 ऑक्टोबर 2021 रोजी महिलेच्या घरी ठरल्याप्रमाणे पूजा घातली. भोंदूबाबाने सांगितल्याप्रमाणे महिलेने घरातील सर्व दागिने पूजेला लावले. पूजा झाल्यानंतर भोंदूबाबाने हातचलाखी करीत पूजेला ठेवलेले सोन्याचे दागिने काढून घेतले. दागिन्यांच्या एका कपड्यात माती आणि दगड ठेवून तो कपडा बांधून कुटुंबांच्या हातात दिला आणि बाबा निघून गेला. हातात दिलेला कपडा 7 दिवसानंतर उघडून पहा असेही महिलेला सांगितले. मात्र 22 ऑक्टोबर रोजी कुटुंबियांनी कपडा सोडला असता त्यात माती दगड निघाल्याने त्यांना धक्का बसला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी 25 ऑक्टोबर रोजी त्यांनी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या तक्रारीनुसार माणिकपूर पोलिसांनी भोंदूबाबावर गुन्हा दाखल करीत त्याचा शोध सुरु केला. पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन दिवसांपूर्वी भोंदूबाबा पोलिसांच्या हाती लागला असून पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहेत.
भोंदूबाबाने गेल्या 4 वर्षात अनेक कुटुंबांना फसविले
पोलिसांनी या भोंदूबाबाची कसून चौकशी केली असता त्याने मागच्या 4 वर्षात अनेक कुटुंबियांना फसवले असल्याचे उघड झाले आहे. वसई, विरार, ठाणे, नवी मुंबई, गुजरात, वापी या परिसरात ही फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे. नालासोपारा, माणिकपूर तसेच मुंबईतील कस्तुरबा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 3 गुन्ह्यात 12 लाख 5 हजार 200 रुपये किंमतीचे 301.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिनेही पोलिसांनी जप्त केले आहेत. नागरिकांनी अशा भोंदूबाबाच्या आमिषाला बळी पडू नये असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. (Woman cheated of lakhs of rupees by Bhondubaba due to superstition in Vasai)
इतर बातम्या
चंद्रपूरमध्ये बर्निंग कारचा थरार, काही मिनिंटामध्ये होत्याचं नव्हतं, पाहा व्हिडीओ