Chandrapur Tiger | चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; तेंदूपत्ता तोडणाऱ्या वृद्ध मजुराचा घेतला घास
जाईबाई सकाळी जंगलात गेल्या. तिथं पाने तोडत असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जाईबाई ठार झाल्या. त्या ताडोबाजवळील मोहुर्ली येथे राहत होत्या.
चंद्रपूर : जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाली. जाईबाई जेंगठे (Jaibai Jengthe) (वय 65) असे हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला मोहुर्ली या जंगलाशेजारील गावातील रहिवासी आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (Tadoba-Dark Tiger Project) बफर क्षेत्रामधील सीताराम पेठ जंगलातील (Sitaram Peth Jungle) ही घटना घडली. तेंदूपाने तोडण्यासाठी महिला जंगलात गेली होती. माहिती मिळताच वन अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले. माहिती पसरताच घटनास्थळावर एकच गर्दी झाली. मृत महिलेचे शव विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. सध्या तेंदूपत्ता तोडण्याचा सीजन आहे. त्यामुळं जंगलाशेजारील लोकं तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात जातात. यातून जंगलाशेजारील गावांना रोजगार मिळतो.
अशी घडली घटना
जाईबाई या नेहमीप्रमाणे यंदाही तेंदुपत्ता तोडायला गेल्या होत्या. गावाशेजारी जंगल असल्यानं अनेक लोकं या कालावधीत सकाळीचं जंगलात जातात. तेंडूपत्ता तोडून झाला की, घरी येऊन त्याचे पुडे तयार करतात. संध्याकाळी दिवाणजीकडं पुडे नेऊन देतात. जाईबाई सकाळी जंगलात गेल्या. तिथं पाने तोडत असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जाईबाई ठार झाल्या.
तेंदूपत्त्यातून मोठा रोजगार
तेंदूपत्ता हा मे, जूनमधील मोठा रोजगार उपलब्ध करून देणारे काम आहे. जंगलातील तेंदुपत्ता गावाशेजारील लोकं तोडतात. ते विकून त्यांना काही पैसे मिळतात. तेंदुपत्ता ठेकेदाराला विकला जातो. हीच पाने तोडण्यासाठी जंगलाशेजारील लोकं जंगलात जातात. अशावेळी वाघाने हा हल्ला केला. दोन दिवसांपूर्वी मुलीवर हल्ला करणाऱ्याबिबट्याला वनविभागानं दुर्गापुरात जेरबंद केलं. आता कोणकोणत्या प्राण्यांना वनविभाग जेरंबद करून पिंजऱ्यात ठेवणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.