हिंदू खतरे में है… मग तुम्ही काय चमचे गोटे खेळत आहात काय?; काँग्रेसच्या महिला नेत्याचा भाजपवर हल्लाबोल
राज्य सरकारने विधवा महिलांना आता गंगा भागिरथी संबोधण्यावर विचार सुरू केला आहे. तसा प्रस्तावच तयार केला आहे. त्यावर काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.
अमरावती : हिंदू खतरे में हैं… हिंदू खतरे में हैं… अशी भाजपकडून वारंवार आरोळी दिली जाते. त्यावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपला चांगलच फटकारलं आहे. हिंदू खतरे में हैं म्हणता तर मग तुम्ही काय चमचे गोटे खेळत आहात काय? केंद्रात तुमचं सरकार आहे. राज्यात तुमचं सरकार आहे. मग हिंदूंना वाचवत का नाही? असा सवाल करतानाच तुम्ही तर संविधानालाही मानत नाहीत. म्हणून तर तोडफोड करून, धमक्या देऊन सरकार बनवता, अशी जोरदार टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
ज्या गोष्टी संविधानात लिहिलेल्या आहेत. त्याचा विपर्यास करता आणि सरकारमध्ये सामील होता. आणि वर म्हणता आम्ही बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होतो. या गोष्टीचा मी निषेध करते, अशी जोरदार टीका यशोमती ठाकूर यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे. संविधान बदलण्याचा कट रचलेला आहे. हा कट कुठे घेऊन जाईल, काय करेल हे सांगता येत नाही. लोकशाहीबद्दल बोलायचं आणि लोकशाही संपवण्याचे काम करायचं असं सध्या सुरू आहे. कधी एक रंग, कधी दुसरा रंग, कधी तिसरा रंग… जो तिरंगा आहे तोच आपला धर्म. तीच आपली जात आहे. संविधान आपला ग्रंथ आहे, असं ठाकूर म्हणाल्या.
उद्या गंगेवर सोडून द्याल
विधवांना गंगा भागिरथी संबोधण्याचं घटत आहे. तसा प्रस्तावच राज्य सरकारने तयार केला आहे. त्यावरही त्यांनी सडकून टीका केली. विधवांना आता गंगा भागिरथी म्हणतात. उद्या केस कापायला लावाल. परवाच्या दिवशी म्हणाल त्यांना गंगेवर सोडून द्या, असा हल्ला त्यांनी राज्य सरकारवर केला. मी पण एक विधवा आहे. मी 29 वर्षाची होती, तेव्हा माझे यजमान गेले. पण संविधान होते म्हणून मी आज तुमच्यासमोर आमदार म्हणून उभी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले होते म्हणून मी शिक्षण घेतलं, असं त्यांनी सांगितलं.
तुम्ही कायरच
यावेळी त्यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावरही टीका केली. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे राखीव मतदार संघ आहे, अमरावतीचा असो की सोलापूरचा त्या ठिकाणी खोटं सर्टिफिकेट घेऊन काही लोक संसदेत गेले आहेत. त्याचा मी निषेध करते. मी काय कोणाला घाबरत नाही. तुमच्या धमक्यांना तर नाहीच नाही. प्रियंका म्हणाल्या, तुम्ही कायर आहात आणि कायरच आहात, असा हल्ला त्यांनी चढवला.