वहिनीचं वैधव्य दूर केलं, भावाच्या मृत्यूनंतर मुलांसाठी वहिनीशी लग्न
लग्नगाठी या नशिबाने बांधल्या जातात, असे म्हटले जाते. मात्र ही नाती अपघातांनी हिरावली तर काय करायचे? या प्रश्नाचे उत्तर अनेकांकडे नसते.
शिरपूर (धुळे) : जुन्या रुढी-परंपरांना फाटा देत शिरपूर येथे आदर्श उदाहरण निर्माण झालं आहे. तऱ्हाडीतील विधवा वहिनीशी दिराने लग्न केलं आहे. मनीषा असं या नवरी मुलीचं नाव आहे. तर जितेंद्र करंके असं नवरदेवाचं नाव आहे. मोठ्या भावाच्या मृत्यूनंतर पोरकी झालेल्या वहिनी मनीषा, तिच्या लहान तीन मुलांचा भविष्याचा विचार करुन जितेंद्र आणि मनीषा यांच्या कटुंबियांनी त्यांचा लग्न करण्याचा निर्णय घेतला.
तरुणाने विधवा वहिनीला तीन मुलांसह स्वीकारले
लग्नगाठी या नशिबाने बांधल्या जातात, असे म्हटले जाते. मात्र ही नाती अपघातांनी हिरावली तर काय करायचे? या प्रश्नाचे उत्तर अनेकांकडे नसते. तरीही परंपरा, समाजाच्या मानसिकतेला फाटा देत तऱ्हाडीतील कुटुंबियांनी आपल्या मोठ्या विधवा सूनेचे लग्न आपल्याच लहान मुलाबरोबर म्हणजे मनीषाच्या दिराबरोबर लावून दिले आहे. भावाच्या निधनानंतर विधवा वहिनीशी लग्न करून अपंग तरुणाने आधार देऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे विधवा वहिनीला तीन मुलांसह तरुणाने स्वीकारले आहे.
नवरी मनीषाच्या पहिल्या पतीचं चार वर्षांपूर्वी निधन
शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी येथील संतोष भिला करंके यांचे सामान्य कुटुंब आहे. त्यांना पाच मुले आहेत. ऑगस्ट 2016 मध्ये संतोष करंके यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर चार महिन्यात त्यांच्या चार नंबरचा मुलगा सुधाकर संतोष करंके यांचे डिसेंबर 2016 मध्ये निधन झाले. त्यांचा पत्नी मनिषा यांच्याशी असणारा संसार अवघ्या नऊ वर्षात तिथेच संपला. पती गेल्याने पंचविशीत असणारी मनीषा विधवा झाली. विधवा मनीषासमोर दुःखाचा डोंगर होता. तीन मुलांचा सांभाळ करण्याचे भलेमोठे आव्हान मनीषा पुढे होते.
नवरदेव प्राथमिक शाळेत शिक्षक
दुसरीकडे पत्नी आणि मुलगा गेल्याने संतोष करंके पूर्णता खचले होते. करंके यांचे दुःख येथेच संपले नव्हते. सर्वात लहान मुलगा जितेंद्र हा दोन्ही पायांनी अपंग आहे. त्याने इंग्रजी विषयात एम.ए.बी.एड.चे शिक्षण केलेले आहे. तो शिरपूर येथे आर सी पटेल प्राथमिक शाळेत इंग्रजी शिक्षक म्हणून नोकरीला आहे. नोकरीला असल्याने त्याला लग्नाला मुलगी मिळेल, अशी भोळ्या बापाला आशा होती. जितेंद्रच्या वयाची पस्तीशी कधीच पार झाली होती. सध्या जितेंद्र हा 38 वर्षांचा आहे.
मित्रांनी प्रेरणा दिल्याने जितेंद्र लग्नासाठी तयार
जितेंद्रच्या लग्नासाठी काहींनी विधवा वहिनी मनीषा हिच्याशी लग्नाचा विषयही काढला. मात्र तो गेल्या तीन वर्षांपासून तडीस जात नव्हता. जितेंद्र याला मनीषाला स्वीकारत असतांना तीन मुलांची जबाबदारी कशी निभावता येईल, याची चिंता होती. त्यामुळे लग्नाचा विषय पुढे सरकत नव्हता. शेवटी भुपेशभाई पटेल हे समाजाच्या कोणत्याही चांगल्या कामासाठी तयार असतात. त्यांनी जितेंद्रला प्रेरणा दिली. यात जितेंद्रचा भाऊ धनराज कंरके आणि वहिनी रत्नमाला कंरके यांनी मोठी भूमिका निभावली.
नागेश्वर मंदिरात विवाह संपन्न
मनीषा हिचे माहेर शिरपूरच्या दहिवद येथीलच आहे. तिचे वडील अशोक दिनकर चव्हाण यांनीही या लग्नाला तात्काळ होकार दिला. शेवटी जितेंद्र आणि मनीषा हे देखील या लग्नासाठी तयार झाले. त्यानंतर 22 जुलैला नागेश्वर मंदिरात त्यांचा विवाह पार पडला. या लग्नात सर्वात जास्त लक्ष सातत्याने जात होते ते त्या तीन चिमुकल्यांकडे. गेल्या साडेचार वर्षांपासून पोरके झालेल्या या तीनही मुलांना काकाच्या रुपात बापाचे छत्र मिळाले आहे. मनीषाच्या जीवनातही साडेचार वर्षांचा अंधार संपला आहे.आणि अपंग असणाऱ्या जितेंद्रला मनीषा आणि तीन मुलांच्या रुपात भक्कम आधार मिळाला आहे. जितेंद्र आणि मनीषाच्या या निर्णयाने समाजापुढे एक आदर्श उदाहरण निर्माण झालं आहे.
लग्न समारंभाला माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, थाळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे, पिपल्स बँकेचे संचालक संजय चौधरी, उत्तमराव माळी, तऱ्हाडी येथील माजी सरपंच ओंकार पाटील, कैलास भामरे, दहिवचे माजी सरपंच लक्ष्मीकांत पाटील,प्रल्हाद पाटील, मुख्याध्यापक सी.डी.पाटील, गणेश साळुंखे हे उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण यांनी माजी मंत्री अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, आर सी पटेल संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले आहेत.
हेही वाचा : Raigad Satara landslide live : रायगड, साताऱ्यानंतर सिंधुदुर्गातही दरड कोसळली, राज्यातील मृतांचा आकडा 72 वर