आमचं प्रेम वेगळं… अजितदादांच्या आमदारांनी शरद पवारांच्या खासदाराला निवडून आणले
राज्यात एका वेगळ्याच निवडणुकीची चर्चा रंगलेली आहे. या निवडणुकीत अजितदादा गटाच्या आमदारांनी शरद पवार गटाच्या खासदारांना निवडून आणण्यासाठी स्वतः मैदानात उडी घेतली होती. नव्हे, त्यांनी त्या खासदारांना निवडूनही आणले.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातून अजित पवार यांनी बंड केले. त्यामुळे काही खासदार, आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले. काही आमदार, खासदार शरद पवार यांच्यासोबत राहिले. या बंडानंतर अजितदादा आणि शरद पवार यांच्यातील संबंध बिघडले. लोकसभा निवडणुकीमध्ये तर या दोन्ही गटामधील आमदार आणि खासदार यांच्यातही वितुष्ट आले. पण, राज्यात एका वेगळ्याच निवडणुकीची चर्चा रंगलेली आहे. या निवडणुकीत अजितदादा गटाच्या आमदारांनी शरद पवार गटाच्या खासदारांना निवडून आणण्यासाठी स्वतः मैदानात उडी घेतली होती. नव्हे, त्यांनी त्या खासदारांना निवडूनही आणले. ही निवडणूक होती कार्ला एकविरा देवस्थान ट्रस्टच्या निवडणुकीची.
लोणावळ्यातील कार्ला आई एकविरा देवी ट्रस्टच्या विश्वस्त पदासाठी निवडणुक झाली. शरद पवार गटाचे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे या निवडणुकीत उभे होते. या पदावर त्यांची वर्णी लागावी यासाठी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके मैदानात उतरले होते. या निवडणुकीत एकूण सात सदस्यांमधील आमदार शेळके यांच्या पाच समर्थकांनी खासदार म्हात्रे यांना मतदान केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
आमदार सुनील शेळके यांनीही याची कबुली दिली. आम्ही स्वतंत्र पक्षात आहोत. मात्र, आमचे प्रेम वेगळे आहे. मी खासदार सुरेश म्हात्रे यांना शब्द दिला होता. तो मी पाळला, असे सांगत आमदार शेळके यांनी निर्माण होणाऱ्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. या विजयानंतर खासदार म्हात्रे यांनी आमदार शेळके यांचे आभार मानले.
आमदार शेळके यांनी या विजयावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, त्यांचा पक्ष वेगळा आहे. पण, मी त्यांना शब्द दिला होता. माझे नाव शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणाऱ्यांच्या यादीत आहे. तर मग त्यांना विचारा, मी कधी येऊ? अशी मिश्किल टिपणी ही आमदार शेळके यांनी खासदार म्हात्रे यांच्यासमोरच केली. मी अजितदादा यांच्यासोबत होतो आणि यापुढेही त्यांच्यासोबतच असेन असेही आमदार शेळके यांनी यावेळी स्पष्ट केले.