Palghar : डोळ्यांदेखत जुळ्या मुलांना गमावणाऱ्या पीडितेची भेट न घेताच मंत्रिमहोदय माघारी!, विजयकुमार गावीत यांचा दौरा चर्चेत
आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत हे काल पालघर जिल्हयाच्या दौऱ्यावर होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. मात्र वैद्यकीय सुविधा वेळत न मिळाल्याने जुळ्या बाळांना गमवाव्या लागणाऱ्या बुधर कुटुंबाची भेट न घेताच ते परतले.
पालघर : काही दिवसांपूर्वी पालघर (Palghar) जिल्ह्यातील मोखाडामध्ये एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली होती. प्रसूती झालेल्या महिलेला आणि तिच्या नवजात जुळ्या बाळांना वेळेत वैद्यकीय सुविधा (Medical facilities) न मिळाल्याने दुर्दैवानं यामध्ये नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. गावाच्या आसपास वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्याने या महिलेला उपचारासाठी झोळीतून तीन किलोमीटर पायपीट करत नेण्याची वेळ कुटुंबीयांवर आली. मोखाडा (Mokhada) येथील बोटोशी ग्रामपंचायतीमधील मरकटवाडीमध्ये ही घटना घडली होती. दरम्यान आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे रविवारी पालघर दौऱ्यावर होते. मात्र ते वैद्यकीय सुविधेभावी जुळ्या बालकांना गमावलेल्या बुधर कुटुंबाला न भेटताच परतल्याने मोखाडा ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. विजयकुमार गावीत यांनी केवळ जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली, मात्र त्यांना बुधर कुटुंबाला भेटण्यासाठी वेळ मिळाला नसल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
ग्रामस्थांचा संताप
आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत हे काल पालघर जिल्हयाच्या दौऱ्यावर होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. मात्र वैद्यकीय सुविधा वेळत न मिळाल्याने जुळ्या बाळांना गमवाव्या लागणाऱ्या बुधर कुटुंबाची भेट न घेताच ते परतल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. मोखाडा ग्रामस्थानी संताप व्यक्त केलाय. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांनी बुधर कुटुंबाची भेट न घेताच गावितांनी आपला दौरा अटोपल्याचे मोखाडा ग्रामस्थांनी म्हटले आहे. या कारणामुळे विजयकुमार गावीत यांचा पालघर दौरा चांगलाच चर्चेत आला आहे.
अजित पवारांनीही उपस्थित केला मुद्दा
सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी याच मुद्द्यावरून आरोग्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली होती, त्यावेळी आरोग्यमंत्री निरुत्तर झाल्याचे पहायला मिळाले होते. सोमवारी हा मुद्दा मांडावा असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागता अजूनही सोविसुविधांचा वनवा असून, तेथील जनतेला वेळेत वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याचे पवार यांनी म्हटलं आहे.