पालघरच्या रुग्णांना ट्रामा केअर सेंटरची प्रतीक्षा, गुजरातचा घ्यावा लागतोय आसरा
जिल्हा निर्मितीनंतर आरोग्य सुविधांबाबत मुंबईला लागून असतानाही पालघर जिल्हा मागासलेलाच राहिला आहे. जिल्ह्यात आरोग्य सुविधांच्या निर्मितीसाठी जिल्हा प्रशासन, राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष केले जात आहे.
पालघर : आदिवासी बहुल लोकसंख्येचा जिल्हा अशी पालघरची ओळख आहे. जिल्हा निर्मितीनंतर जिल्ह्याची वाटचाल दशकपूर्तीच्या दिशेने सुरू आहे. परंतु, जिल्हा आरोग्य दळणवळण आणि नागरी सुविधांच्या विकास अद्यापही दृष्टिपथात नाही. जिल्हा निर्मितीनंतर आरोग्य सुविधांबाबत मुंबईला लागून असतानाही पालघर जिल्हा मागासलेलाच राहिला आहे. जिल्ह्यात आरोग्य सुविधांच्या निर्मितीसाठी जिल्हा प्रशासन, राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यातच पालघर जिल्ह्यात एकमेव उभारण्यात येणाऱ्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग लगतच्या ट्रामा केअर सेंटरच्या कामाची सध्या निधी अभावी रखडपट्टी झालेली पाहायला मिळते .परिणामी जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी मुबंई किंवा गुजरातचा आसरा घ्यावा लागत आहे.
पालघर जिल्ह्यात 200 खाटांचे ट्रामा केअर सेंटर प्रस्तावित आहे. ट्रामा केअर सेंटर आतापर्यंत 74 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. तर, 38 कोटी रुपये वाढीव रकमेची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने उच्चाधिकार समितीकडे केली आहे. मात्र, हा वाढीव निधी उच्चाधिकार समितीने मंजूर न केल्याने गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेले ट्रामा केअर सेंटरचे काम कासवगतीने चालले आहे.
सदर ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्याच्या मार्गावर आले आहे. परंतु, इमारतीमध्ये वायरिंग, लिफ्ट, फर्निचर, पाणीपुरवठा, कुंपण, ऑक्सिजन पाइप लाइन तसेच रुग्णांसाठी बेड आणि ऑपरेशनचे साहित्य या सारख्या साहित्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असून तशी मागणी सावर्जनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आली आहे.
अतिरिक्त निधीच्या मागणीच्या प्रस्ताव उच्चाधिकार समितीकडे विचाराधीन आहे. या समितीच्या मान्यतेनंतर जुलै महिन्यात निधी उपलब्ध होईल. परंतु, रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू होण्यासाठी नवीन वर्ष उजाडण्याची शक्यता आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्हा रुग्णालय आणि अद्ययावत शासकीय आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने जिल्ह्यात आरोग्य सुविधांची वानवा आहे. त्यामुळे रुग्णांना गुजरात राज्यात धाव घ्यावी लागत असताना ट्रामा केअर सेंटरची रखडपट्टी कायम असल्याने जिल्ह्यातील रुग्णांचे हाल होत आहेत.
दरम्यान, ग्रामीण भागातील गरजू रुग्ण, महामार्गावरील अपघातातील गंभीर जखमी रुग्णांच्या उपचार मिळण्यासाठी आवश्यक आणि जिल्ह्यातील आरोग्य सुविधेचा बळकटी देणाऱ्या महत्त्वकांक्षी ट्रामा केअर सेंटर सुरू होण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी आणि आरोग्य विभागाकडून प्रयत्न होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
किती निधीची आवश्यकता
– 11℅ इलेक्ट्रिक वायरिंग 6 कोटी 58 लाख
– रेन वाटर हार्वेस्टिंग 16 लाख
– अग्निशमन सुविधा 2.03 कोटी
– फर्निचर 11.87 कोटी
– गॅस पाइप लाइन ऑक्सिजन पाइपलाइन 3.51 कोटी
– बायो डायजेस्टर 70 लाख
– कुंपण आणि प्रवेशद्वार 1.50 कोटी
– बगीचा आणि समतल जागा निर्मिती 10 लाख
– लिफ्ट 2.69 कोटी
– AB रूम,परिसर विद्युतीकरण, पंप आणि जनरेटर 2.53 कोटी
– सीसीटीव्ही 65 लाख
– पाणीपुरवठा योजना 33 लाख
– जीएसटी 3.88 कोटी
– 10℅ दर वाढ 3.23 कोटी