“शेतकऱ्यांचे पंचनामे थांबणार नाहीत”; अवकाळीच्या प्रश्नावर ‘या’ मंत्र्याने शेतकऱ्यांना दिलासा दिला
अवकाळी पावसामुळे ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्या त्या शेतकऱ्यांना त्यांचा मोबादला मिळवून देण्याची जबाबदारी ही सरकारची असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. गहू, मका, ज्वारी, द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील अनेक द्राक्ष बागायतदारांच्या द्राक्ष बाग जमिनदोस्त झाल्यामुळे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. त्यातच शासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजनेसाठी बेमुदत संप पुकारल्यामुळे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे होणार की नाही असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनीही आमच्या नुकसानीचे पंचनामे होणार की नाही असा सवाल करत होते.
शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की, ज्या ज्या परिसरात अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.
त्या त्या परिसरातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे केले जातील. शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम पंचनाम्यावर होणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलताना सांगितले की, अवकाळी नुकसान पंचनामे हे गंभीरपणे अधिकाऱ्यांकडून केले जाणार आहेत.त्यामुळे याबाबत सर्व जिल्हाधिकारी, प्रांत आणि तहसीलदार यांना सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी विखे पाटील यांनी सांगितले.
अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान आणि त्याचे केले जाणारे पंचनामे हे कोणत्याही परिस्थिती थांबणार नाहीत अशा सुचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
अवकाळी पावसामुळे ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्या त्या शेतकऱ्यांना त्यांचा मोबादला मिळवून देण्याची जबाबदारी ही सरकारची असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
अधिकारी लोकाना सरकारकडून पंचनाम्याच्या सूचना देण्यात आल्यामुळे राज्यातील कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.