पोलिओ डोस देताना झाकण बाळाच्या पोटात, पंढरपुरात आरोग्य कर्मचाऱ्यांची हलगर्जी
पंढरपुरात पोलिओ लस देताना ड्रॉपसोबत प्लास्टिकचे झाकणही बाळाच्या पोटात गेले. (Pandharpur Baby Polio Dose)
पंढरपूर : यवतमाळनंतर आता पंढरपुरातही चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याचं समोर आलं आहे. लहान बाळाला पोलिओ लस देताना ड्रॉपसोबत प्लास्टिकचे झाकणही (नोझल) बाळाच्या पोटात गेले. बाळाची प्रकृती ठीक असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. (Pandharpur Baby swallowed Nozzle while giving Polio Dose)
बाळाची प्रकृती ठीक
पंढरपूर जिल्ह्यातील भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली. पोलिओचे ड्रॉप पाजणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याची हलगर्जी उघड झाली आहे. संबंधित एक वर्षाच्या बाळाची आई रविवारी त्याला घेऊन पोलिओ बूथवर ड्रॉप देण्यासाठी आली होती. यावेळी लस देताना ड्रॉपसोबत प्लास्टिकचे झाकणही बाळाच्या पोटात गेले. उपचारासाठी बाळाला दवाखान्यात अॅडमिट केले असून बाळाची प्रकृती ठीक असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
तीन आरोग्य कर्मचाऱ्यांना नोटीस
भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील तीन आरोग्य कर्मचाऱ्यांना या प्रकरणी नोटीस देण्यात आली आहे. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित रेपाळ यांनी दिला. निष्काळजी करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे.
यवतमाळमध्ये पोलिओ लसीऐवजी सॅनिटायझर पाजले
भंडारा रुग्णालयातील अग्निकांडाची घटना ताजी असतानाच चिमुकल्यांच्या आरोग्याबाबत हलगर्जी बाळगणारी घटना यवतमाळमध्ये समोर आली होती. पोलिओ लसीकरणावेळी सॅनिटायजर पाजल्यामुळे यवतमाळमध्ये 12 चिमुकल्यांची प्रकृती बिघडली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हलगर्जीमुळे पाच वर्षांखालील चिमुरड्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
यवतमाळमधील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणावेळी हा प्रकार घडला. लहान मुलांना पोलिओच्या डोसऐवजी सॅनिटायजर पाजले. 12 लहान बालकांना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. वय वर्ष ते पाच वयोगटातील ही लहान मुलं आहेत. (Pandharpur Baby swallowed Nozzle while giving Polio Dose)
भंडाऱ्यात दहा नवजात बालकांचा होरपळून मृत्यू
9 जानेवारी रोजी भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला मध्यरात्री आग लागली होती. या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. त्यात 8 मुली तर 2 मुलांचा समावेश होता. या आगीत 3 बालकांचा होरपळून तर 7 बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला होता. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीनं केलेल्या तपासात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आग लागल्याचं समोर आलं आहे.
संबंधित बातम्या –
भंडारा शासकीय रुग्णालयातील आगीला जबाबदार कोण? राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर मोठं प्रश्नचिन्ह
पोलिओ लसीकरणावेळी हलगर्जी, सॅनिटायजर पाजल्याने यवतमाळमध्ये 12 चिमुकले रुग्णालयात
(Pandharpur Baby swallowed Nozzle while giving Polio Dose)