विठुरायाच्या पंढरीलाही पुराचा वेढा!, सहा हजार नागरिकांचं स्थलांतर होणार
पंढरपूर: परतीच्या पावसानं राज्यभरात थैमान घातलंय. कोकणासह मराठवाड्यात पावसाचा कहर सुरुच आहे. या मुसळधार पावसाचा फटका आता विठुरायाच्या पंढरीलाही बसतोय. उजनी आणि वीर धरणातून मध्यरात्री ३ लाथ क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. आज हे पाणी पंढरपुरात दाखल होईल. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं आहे. पंढरपुरात एनडीआरएफचं पथक तैनात करण्यात आलं आहे. शहरातील अहिल्यादेवी पूलही […]
पंढरपूर: परतीच्या पावसानं राज्यभरात थैमान घातलंय. कोकणासह मराठवाड्यात पावसाचा कहर सुरुच आहे. या मुसळधार पावसाचा फटका आता विठुरायाच्या पंढरीलाही बसतोय. उजनी आणि वीर धरणातून मध्यरात्री ३ लाथ क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. आज हे पाणी पंढरपुरात दाखल होईल. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं आहे. पंढरपुरात एनडीआरएफचं पथक तैनात करण्यात आलं आहे. शहरातील अहिल्यादेवी पूलही वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. पुराचा फटका बसू शकणाऱ्या एकूण ६ हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात येणार आहे. मध्यरात्रीच्या सुमारास १ हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांना विठ्ठल-रुख्मिणी मंदिर समितीकडून जेवणाची सोय करण्यात येणार असल्याची माहिती पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे. (Pandharpur 6 thousand people migrate because of heavy rain)
या पुराचा फटका पंढरपूरसह 55 गावांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील ओढे, नाले, नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळं इथलं दळणवळणही बंद झालं आहे. पुरामुळं पंढरपूर-मोहोळ, पंढरपूर-सातारा, पंढरपूर-विजापूर हा रस्ताही बंद करण्यात आलाय.
चंद्रभागेच्या घाटाची भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू
शहरातील चंद्रभागा नदीकडेला नव्याने बांधण्यात येत असलेल्या कुंभार घाटाची भिंत कोसळली. घाटाच्या भिंतीच्या आडोशाला उभ्या असलेल्या आठ जणांपैकी सहा जणांचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला आहे. मंगेश गोपाळ अभंगराव(वय 35), राधाबाई गोपाळ (वय 50), पिलू उमेश जगताप (वय 13), गोपाळ लक्ष्मण अभंगराव (वय 70), आणि दोन वारकरी महिलांचा मृत्यू झाला आहे. दोन जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
मराठवाड्यात शेतकऱ्यांचे अश्रूही वाहून गेले!
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह सोलापूर जिल्ह्यात जवळपास 4 ते 5 वर्षानंतर परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावायला सुरुवात केली. पण निसर्ग असा काही कोपला की खरिपाचं पीक डोळयासमोर पाण्यात वाहून गेलं. उस्मानाबाद, लातूर, बीड, औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांनी काढून ठेवलेलं सोयाबिन वाहून गेलं. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळं उभा ऊस झोपला. तर कांदा, डाळिंब, द्राक्ष पिकांचंही अतोनात नुकसान झालं.
पेरणीवेळी सोयाबिनचं बोगस बियाणं उगवलं नाही. त्यामुळं मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. कृषीमंत्र्यांनी बांदावर जात पाहणी केली आणि मदतीचं आश्वासनही दिलं. त्या मदतीची प्रतिक्षा शेतकरी अजूनही करत आहे. पण खचून न जाता शेतकऱ्यांनी प्रचंड मेहनतीच्या जोरावर सोयाबिन पिकवलं. यंदा उतारही चांगला पडणार म्हणून शेतकरी आनंदात होता. पण परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पुन्हा एकदा पाणी फिरवल्याचं मराठवाड्यात सर्वत्र पाहायला मिळतं आहे.
कोकणात भात शेती धोक्यात
कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्गसह सर्वच जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतोय. या पावसानं काढणीला आलेलं भाताचं पीक धोक्यात आलंय. त्यामुळं भात उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय.
संबंधित बातम्या:
शेतकऱ्यांवर आभाळ कोसळलं, गाळ-चिखलात लोळून धाय मोकलून रडण्याची वेळ
Pandharpur 6 thousand people migrate because of heavy rain