पंढपूरच्या विठुरायाचे चरणस्पर्श दर्शन मिळणार फक्त 2 तासात, कसे आणि कधीपासून? जाणून घ्या
सध्या दर्शनासाठी भाविकांना 17 ते 18 तास लागतात. टोकन दर्शनाची व्यवस्था सुरु झाल्यानंतर 2 तासांमध्ये लाडक्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन मिळणार आहे.
Pandharpur Vitthal-Rukmini Mandir Darshan : करोडो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक उत्सुक असतात. मात्र लांबच लांब रांगा आणि गर्दी यामुळे अनेकांना पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनापासून वंचित राहावे लागते. मात्र आता पंढरपुरातील लांबच लांब दर्शन रांग इतिहासजमा होणार असून भाविकांना केवळ 2 तासात विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच तिरुपतीच्या धर्तीवर विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात टोकं दर्शनाची सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लागणारा दर्शन मंडप आणि स्कायवॉकसाठी राज्य सरकारच्या उच्यधिकार समितीने मान्यता दिली आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना केवळ 2 तासात दर्शन मिळणार आहे. विशेष म्हणजे आषाढी एकादशीलाही ही सुविधा सुरु असणार आहे. यासाठी 110 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. येत्या महिन्याभरात या कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी लागणारा दर्शन मंडप आणि स्कायवॉकसाठी राज्य सरकारच्या उच्यधिकार समितीने शनिवारी मान्यता दिली आहे.
पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात दर्शनासाठी गोपाळपूर पत्राशेड येथे चार मजली अद्ययावत दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे. त्यासोबत या ठिकाणाहून थेट मंदिरापर्यंत 1050 मीटर लांबीचा स्काय वॉक उभारला जाईल. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन आपले टोकन घ्यावे लागणार आहे. टोकनवर दिलेल्या वेळेपूर्वी अर्धा तास भाविकांना या प्रतीक्षा कक्षात पोचावे लागेल. यानंतर मोजून दीड ते दोन तासात हा भाविक थेट विठ्ठल -रुक्मिणीच्या मंदिरात या स्कायवॉक मधून चालत पोहचू शकणार आहे.
लवकरच निघणार शासन निर्णय
या पार्श्वभूमीवर ११० कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या चार माजली दर्शन मंडपात भाविकांसाठी स्वच्छतागृहे, उपहारगृह, आरोग्य व्यवस्था तसेच विश्रांती कक्ष उभारले जाणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने १२९ कोटींचा आराखडा सादर केला होता. या सादर केलेल्या आराखड्यापैकी राज्याच्या मुख्य सचिव सुनीता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने 110 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे. आता पुढील महिन्यात मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील राज्य शिखर समितीच्या बैठकीत हा आराखडा अंतिम होऊन शासन निर्णय निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोणकोणत्या सुविधा असणार?
तसेच दर्शन रांगेत भाविकांसाठी पिण्याचे पाणी, शौचालयाची सुविधा, वेटिंग हॉल, दर्शनासाठी टोकन घेण्याची सुविधा, रिफ्रेशमेंट, आपत्तीमध्ये बाहेर पडण्याची व्यवस्था, हिरकणी कक्ष, दिव्यांगासाठी सुविधा, अग्नि विरोधक सुविधा, पोलीस, जेवणाची व्यवस्था, पार्किंगची सुविधा या बाबींचा समावेश करण्यात येणार आहे.
भाविकांना मोठा दिलासा
टोकन दर्शन व्यवस्थेनंतर आता भाविकांना केवळ दोन तासात पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे. गोपाळपूर रोडवरील पत्रास शेड या ठिकाणी दर्शन मंडप उभारुन टोकन व्यवस्था केली जाणार आहे. सध्या दर्शनासाठी भाविकांना 17 ते 18 तास लागतात. टोकन दर्शनाची व्यवस्था सुरु झाल्यानंतर 2 तासांमध्ये लाडक्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन मिळणार आहे. यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.