पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज : पाऊस पडणार नाही, पण थंडी…; शेतकऱ्यांसाठी काय आवाहन?
Panjabrao Dakh Weather forecast : सध्या थंडीचा कडाका वाढला आहे. महाराष्ट्रभरात सगळीकडेच तापमान घटलं. पंजाबराव डख यांनी सध्याच्या महाराष्ट्राच्या तापमानाबद्दलचा अंदाज वर्तवला आहे. पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. वाचा सविस्तर...
डिसेंबरच्या मध्यात सध्या आपण आहोत. मागच्या दोन दिवसांपासून राज्यातील तापमानाचा पारा घसरला आहे. थंडीची लाट राज्यभर पसरली आहे. फेंगल वादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता पुन्हा एकदा थंडी वाढली आहे. तापमान कमी झाल्याने याचा काही रब्बी पीकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. जळगाव जिल्ह्यात हंगामातील सर्वांत कमी ८ अंशाची नोंद करण्यात आली आहे. तर नाशिकमध्ये थंडीचा पारा घसरलेलाच आहे. मागच्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. आजदेखील नाशिकमध्ये पारा 10.4 अंश घासरलेला आहे. त्यामुळे नाशिकमधील शेतकऱ्यांनी या काळात पिकांची काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पंजाबराव डख यांचा सल्ला काय?
महाराष्ट्रात आता पुढील दहा ते बारा दिवस थंडीची लाट राहणार आहे. राज्यात आता पाऊस पडणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. पण आपल्या शेतीची कामांचं नियोजन करावं. राज्यातील सध्याचे हवामान हे कांदा काढणीसाठी विशेष पोषक असून ज्या शेतकऱ्यांची कांदा काढणी बाकी असेल त्यांनी कांदा काढणी करायला हरकत नाही, असा सल्ला पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांला पीकांची काळजी घेण्याचा सल्ला
उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात जोरदार थंडीची लाट येणार आहे. मात्र या हवामानाचा द्राक्ष पिकाला फटका बसण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी कडाक्याच्या थंडीपासून आपल्या पिकाचे संरक्षण करावं, असं आवाहन डख यांनी केलं आहे.
तिरुपतीच्या दर्शनासाठी आंध्रप्रदेशमधील तिरुमला या ठिकाणी जाणार असाल तर तुमच्यासाठीही पंजाबराव डख यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. तिरुपतीला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांकरिता एक महत्त्वाची माहिती आहे. 13 आणि 14 डिसेंबरला तिरुपती आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात 17 आणि 18 तारखेला देखील जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. यामुळे तिरुपती ला जाणाऱ्या भाविकांनी हा अंदाज लक्षात घेऊनच आपल्या ट्रिपचं आयोजन करावं, असं पंजाबराव डख यांनी सांगितलं आहे.