भाग बदलत पाऊस पडणार, पेरणी करताना शेतकऱ्यांनी…; पंजाबराव डख यांचा पावसाबाबतचा अंदाज काय?
Panjabrao Dakh Weather Forecast Report : हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी हवामानाचा आणि पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी पीकांची पेरणी कधी करावी, याबाबतचाही सल्ला दिलाय. तसंच पाऊस कसा पडेल? त्याचं स्वरुप काय असेल यावरही पंजाबराव डख यांनी भाष्य केलंय.
मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. काही ठिकाणी दमदार पाऊस होतोय. तर काही ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी कोसळत आहेत. अशात बळीराजा खरीप पिकांच्या पेरणीच्या तयारीला लागलाय. पेरणी कधी करावी? याचा अंदाज शेतकरी घेत आहेत. पण पेरणी नेमकी कधी करावी? याची शेतकरी चाचपणी करत आहेत. अशातच हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पावसाबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे. पाऊस कधी आणि किती प्रमाणात पडणार? यावर पंजाबराव डख यांनी अंदाज व्यक्त केलाय. शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी, यावरही पंजाबराव डख यांनी भाष्य केलं आहे.
पंजाबराव डख यांचा अंदाज काय?
राज्यात 14 जूनपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. परंतु या कालावधीत राज्यातील दक्षिणेकडील भागांमध्ये चांगला पाऊस पडणार अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, पंढरपूर या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार नाही. तसेच 15 ते 16 जून दरम्यान पावसाची विश्रांती पाहायला मिळू शकते, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांना सल्ला काय?
16 जून नंतर पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे. साधारणता 18 जून नंतर जोरदार पाऊस सुरु होईल. आता महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र शेतकऱ्यांनी थोडी प्रतिक्षा करूनच पेरणी करावी. जमीन किमान सहा इंच ओल गेल्यानंतरच पेरणी करण्याचा निर्णय घ्यावा, असा सल्ला पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना दिला.
शेतकरी काही वेळी पेरणी लवकर करतात. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट येतं. यावरही डख बोलले आहेत. पेरणीचा निर्णय घाई घाईने घेऊ नये. अन्यथा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागू शकते. मनसोक्त तसंच पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर पेरणीचा निर्णय घेतला पाहिजे. जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागणार नाही, असा सल्लाही पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना दिलाय.