मुंबईः विधान परिषद निवडणुकीत भाजपने उभ्या केलेल्या उमेदवारांमध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना स्थान देण्यात आलं नाही. यावरून विविध स्तरावर प्रतिक्रिया उमटत आहेत. एकिकडे मराठवाड्यातील पंकजा समर्थकांचा एक भला मोठा गट नाराज आहे. तर विविध राजकीय पक्षांनीही या निर्णयामागे नक्की कुणाचा तरी हात आहे, असा आरोप केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीदेखील पंकजा मुंडे यांना विधान परिषद उमेदवारी न देण्यावरून प्रतिक्रिया दिली. आजच्या दैनिक सामनामध्ये त्यांनी मुंडे कुटुंबियांची होणारी उपेक्षा यावर भाष्य केलं आहे. तसेच आज पत्रकारांशी संवाद साधतानाही त्यांनी असेच उद्गार काढले. निवडणुकीत कुणाला उमेदवारी द्यायची हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र एकूणच स्थिती पाहता मुंडे-महाजनांचा (Pramod Mahajan) प्रभाव संपुष्टात आणण्याचा डाव असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.
पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, ‘ कुणाला उमेदवारी द्यायचा हा भाजपचा अंतर्गत विषय आहे. खडसेंना द्यायचं की डावलायचं, पंकजांना उमेदवारी द्यायची की नाही? ..पण मुंडे महाजनांशी युतीच्या काळात आमचा निकटचा संबंध आला. त्यांच्यामुळे युतीला बळ मिळत गेलं. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबाच्या बातम्या व्यथित करणाऱ्या आहेत. पंकजा मुंडे यादेखील आपल्या वडिलांप्रमाणे बहुजन समाजाच्या नेत्या आहेत. त्यांना उमेदवारी नाकारल्याने विविध क्षेत्रात पडसाद उमटले. पडद्यामागून कुणीतरी देशातून संपवायचे प्रयत्न करत आहेत, ही शंका आहे.’
दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणावर आजही मुंडे आणि महाजन यांचापगडा आणि प्रभाव असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. हा पंकजा मुंडेंचा किंवा बहुजन नेतृत्वाचा नाही तर फक्त मुंडे कुटुंबाचा प्रश्न आहे, त्यावर मी भाष्य केलंय, असंही संजय राऊत म्हणाले.
पंकजा मुंडे यांना उमेदवारी डावलणं आणि यापूर्वी खडसेंच्या नेतृत्वालाही डावलणं यामागे नक्की कुणाचा तरी हात आहे. पडद्यामागून कुणीतरी सूत्र हलवतंय, अशी शंका संजय राऊत यांनी व्यक्त केली. यात त्यांनी थेट कुणाचं नाव घेतलं नसलं तरीही त्यांचा इशारा देवेंद्र फडणवीसांकडे असल्याचं स्पष्ट आहे. पंकजांच्या नावाला देवेंद्र फडणवीसांनी जाहीर समर्थन दिलं असलं तरीही पंकजा मुंडे आणि फडणवीसांमधील धुसपूस महाराष्ट्राला परिचित आहे. तसेच भाजपमध्ये असताना एकनाथ खडसेंची वारंवार नाराजी ओढवून घेणंही भाजपाला कसं शक्य झालं, याचेही दाखले महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळानं पाहिले आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी पंकजा मुंडेंच्या विधान परिषद उमेदवारी विषयाच्या आडून देवेंद्र फडणवीसांवार आरोप केले आहेत, असं म्हणता येईल.