सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर जरांगेंनी दिला शब्द, म्हणाले “तुमच्या मागण्या…”
या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतीची एका माथेफिरुने विटंबना केली. या घटनेनंतर परभणीत आंबेडकरी अनुयायांनी आंदोलन केले. यावेळी काहींनी जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली. यानंतर सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत मृत्यू झाला. सोमनाथ सुर्यवंशीच्या पोस्टमॉर्टम अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. त्याचे गंभीर पडसाद सध्या राज्यात उमटत आहेत. आता या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
“मी सुर्यवंशी कुटुंबासोबत”
“मी इथे भाषण करायला नाही आलो आणि मी भाषणही करत नाही. मी गरीब असल्याने मला त्यांचे दुःख कळते. त्यांच्या आईने सांगितले की पोलिसांनी अमानुष मारहाण केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींना पाठीशी घालू नये. या घटनेला जातीने पाहू नका. मी मंत्र्यांना सांगतो की कुटुंबाच्या सर्व मागण्या तातडीने मान्य करा. मी सुर्यवंशी कुटुंबासोबत आहे”, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू मारहाणीत झाला, अशी माहिती रिपोर्टमध्ये आहे. पण गृहमंत्री म्हणून तुमची जबाबदारी आहे की कुटुंबियांना न्याय देणे. सगळ्या मागण्या मान्य करेपर्यंत मी तुमच्यासोबत आहे. मी शब्द दिल्यानंतर मागे हटत नाही. पण कुटुंबाला न्याय देणे गरजेचे आहे”, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
“एकही आरोपी सुटता कामा नये”
“जर सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय दिला नाही तर यांना रस्त्यावरची काय लढाई आहे हे आपण दाखवून देऊ. त्यांच्या दुःखाची जाणीव आम्हाला आहे. या राज्याची जनता एकच आहे. मग आता प्रश्न कसा सोडवत नाही, हे आपण पाहू. आपण एक जीवाने या कुटुंबाच्या मागे उभे राहू. मुख्यमंत्र्यांना जो डबल तपास करायचे तो करा, मात्र एकही आरोपी सुटता कामा नये”, असे मनोज जरांगे म्हणाले.
“तुम्हाला तपास लागत नसला तरी जनता तपास करेल”
“तुम्हाला तपास लागत नसला तरी जनता तपास करेल. इतका निर्घृणपणे खून कोणाचाही झालेला नाही. मी जे बोलतो ते करतो. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून जर तुम्ही सहज लोकांचे जीव घेत असाल म्हणजे जीव गेला. त्याला न्याय कधीच मिळणार नाही. आरोपीला अटक होणार नाही का?” असे अनेक प्रश्न मनोज जरांगेंनी उपस्थितीत केले.
“बीड हत्या प्रकरणी सरकार आरोपींना वाचवत आहे. बीडमधील सर्व प्रकरण बाहेर काढणार आहे. संतोष देशमुखांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येमागचा एकही गुन्हेगार सुटला नाही पाहिजे”, असेही मनोज जरांगे म्हणाले.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळी अनेक आंदोलनकर्त्यांनी नेमकं काय घडलं? याबद्दलची माहिती दिली. सोमनाथ सूर्यवंशी विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्या. तसेच पोलिसांना कठोर शिक्षा द्या. पोलीस लाठीचार्जमध्ये महिलांना झालेल्या मारहाण केल्याचे फोटो दाखवण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटलांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अभिवादन करण्यात आले आहे.