संविधानाच्या लाल रंगावरून काँग्रेसवर टीका करणाऱ्या भाजपला उद्धव ठाकरेंचा खडा सवाल; म्हणाले, तुम्हाला कसं…
Uddhav Thackeray on BJP and PM Narendra Modi : उद्धव ठाकरे यांनी काल परभणीच्या सभेत बोलताना भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी भाजप, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांना सवाल केला आहे. तसंच एकनाथ शिंदे यांच्यावरही उद्धव ठाकरेंनी जोरदार टीकास्त्र डागलं आहे. वाचा सविस्तर....
काँग्रेस नेते राहुल गांधी जेव्हा जाहीर सभांमध्ये भाषण करतात. त्यावेळी ते संबिधान दाखवतात. या संविधानाच्या लाल रंगावरून भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे. संविधानाचा रंग लाल का? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्याला काल परभणीच्या सभेतून उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. राज्याच्या निवडणुकीत देशाचा पंतप्रधान एका फडतूस पक्षाच्या प्रचाराला येऊ कसा शकतो. ते सांगत आहेत काँग्रेसला संविधान बदलायचे आहे. मात्र संविधान हा केंद्राचा विषय आहे. राज्याच्या निवडणुकीत त्याचा काय संबंध? मी काँग्रेसचा प्रवक्ता नाही. मात्र त्या लाल संविधानामध्ये कोरी पानं होती, हे तुम्हाला कसं माहित?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.
मोदी- शाहांवर निशाणा
उद्धव ठाकरेंना किंमत नाही. पण उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाला किंमत आहे. अमित शाह, नरेंद्र मोदी आणि मिंदे यांना नाही. मोदीजी तुम्ही किती प्रयत्न करा तुम्ही माझ्यापासून निवडून नागरिकांना तोडू शकत नाही. महायुती म्हणजे महाराष्ट्राची अधोगती गुजरातची प्रगती… सगळं काही गुजरातला नेत आहेत. काल परवापासून मोदी, शाह महाराष्ट्रात येत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
परभणीत आल्यावर होम पीचवर आल्यासारखे वाटते. गद्दारी झाल्यानंतर ही राहुल पाटील आणि तुम्ही सोबत राहिलात. चार ही उमेदवारांना तुम्हाला विजय करावाच लागेल. आता सत्ता आली नाही तर महाराष्ट्र हातातून गेलाच समजा… आपल्या हक्काची राजधानी मुंबई ते अदानींच्या घशात घालत असतील. तर तुमच्या सात बारावर नाव आलं नाही तर कसं?, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
लाडकी बहीण योजनेवर भाष्य
तुम्ही म्हणता की, सुप्रिया ताईला मुख्यमंत्री करायचं, पण तुम्हाला देशाला काय करायचं सांगा…. मी अमित शाह यांना आव्हान देतो, तुमचा मुलगा जो आहे जय शहा, त्याने क्रिकेट खेळून दाखवावं… मोदी शाह इथे प्रचार करत असताना तिकडे मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होत होते. तेथे अत्याचार होत असलेली ती यांची लाडकी बहीण नव्हती का? मणिपूरमध्ये काँग्रेसचा सरकार आहे? मोदी, शाह तुम्ही आधी राजीनामे द्या, नंतर स्टार प्रचारक व्हा… अनेक भाजप नेते खाजगी सांगतात या दोघांनी आमचा पक्ष संपवला. कोरोना आणि संकट काळात मोदी राज्यात आले नाही, गुजरातला गेले होते. त्यांना यायची गरजही नव्हती तेव्हा आपल्या सरकार होतं. आपण कधी केंद्रासमोर हात पसरले नाही. लाडकी बहिण योजनेसारखा आम्ही कधी प्रचार केला नव्हता. आमच्या सरकार आल्यास पुन्हा कर्जमुक्ती करू, असं उद्धव ठाकरे परभणीच्या सभेत म्हणाले.