बाबासाहेबांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर देशाचे दोन तुकडे झाले असते; विजय वडेट्टीवार यांच्या विधानाने खळबळ
Vijay Wadettiwar on Babasaheb Ambedkar and Muslim Religion : बाबासाहेब आंबेडकर आणि मुस्लीम धर्माविषयी विजय वडेट्टीवार यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. बाबासाहेबांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर देशाचे दोन तुकडे झाले असते, असं ते म्हणालेत. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.
नजीर खान, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, परभणी | 20 नोव्हेंबर 2023 : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मुस्लीम धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर आज देशाचे 2 तुकडे झाले असते, असं विजय वडेट्टीवार म्हणालेत. ते परभणीत बोलत होते. परभणीत आज थायलंड इथल्या सहा फूट उंचीच्या पन्नास बुद्धरूप मूर्तीचे वितरण करण्यात आलं. वैश्विक धम्मदेशनाचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याला विजय वडेट्टीवार उपस्थित होते. यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केलंय.
वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
परभणीत गौतम बुद्धांच्या मूर्ती वितरण सोहळ्याला विजय वडेट्टीवार उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी आजच्या परिस्थितीवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराचा विषयावर त्यांनी भाष्य केलं. आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर आज देशाचे तुकडे करावे लागले असते, असं वादग्रस्त विधान केलं आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर, मंदिरातील दानपेठ्यांवरूनही त्यांनी पुजाऱ्यांना लक्ष केलं. मंदिरातील दानपेठ्या काढल्या तर पुजारी पळून जातील मंदिराची देखरेखही करणार नाहीत, असं वडेट्टीवार म्हणालेत.
वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर नाराजी
विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सध्या पेटलेला आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी विजय वडेट्टीवार आवाज उठवत आहेत. अशातच आता विजय वडेट्टीवार यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर टीका केली जात आहे.
“वडेट्टीवारजी, हे ध्यानात ठेवा”
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी या वक्तव्यावर टीका केली आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धर्मांतराबद्दल एक वक्तव्य केल्याचं समजत आहे. विजय वडवेट्टीवार संविधाननिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाभीमानी होते. त्यामुळे भारत देशाचा धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक अभ्यास करूनच भारत देशातील मूळ बौद्ध धम्म पुनर्जीवित करून बौद्ध धम्म स्वीकारला. वडवेट्टीवारजी, पुणे करार झाला नसता तर भारतातील बहुजनांचे चित्र खूप वेगळं असतं. तसंच तुम्ही म्हणाला होता. आम्ही ओबीसी असल्यामुळे अन्याय होतो ही म्हणण्याची सुद्धा वेळ तुमच्यावर आली नसती त्यामुळे वडवेट्टीवार संविधाननिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं ऑडिट करण्याइतपत तुम्ही तत्वज्ञानी नाही हे कृपया तुम्ही ध्यानात ठेवा, असं सचिन खरात म्हणालेत.