MP Sanjay Jadhav : परभणी हिंसाचारावेळी ‘एक हे तो सेफ हे’ म्हणणारे कुठे गेले? ठाकरे गटाचे खासदार संजय जाधवांचा खोचक सवाल
Parbhani Violence MP Sanjay Jadhav Reaction : परभणीत हिंसाचार झाला, त्यावेळी 'एक हे तो सेफ हे' म्हणणारे कुठे गेले होते? असा खोचक सवाल खासदार संजय जाधव यांनी विचारला आहे. ठाकरे गटाच्या खासदाराने सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली आहे. त्यावरून वाद उफळला आहे.
परभणीत गेल्या दोन दिवसात मोठी घडामोड घडली. शहरात आगडोंब उसळला. हा हिंसाचार थांबवण्यासाठी ‘एक हे तो सेफ हे’ चा नारा देणारे कुठे होते? असा खोचक सवाल परभणीचे खासदार संजय जाधव यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे. बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है च्या घोषणा देत भाजपाने या शहरात मोर्चा काढला होता. त्यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना असा टोला लगावला.
काय म्हणाले जाधव?
परभणी जी घटना झाली त्या घटनेचा सर्वप्रथम निषेधच आहे. देशातीलच नाही तर पूर्ण जगातील बाबासाहेबांना मानणाऱ्या व्यक्तींनी या घटनेचा निषेध केला. घटना करणारा कोण आहे? कसा आहे? हा तपासाचा भाग आहे, या गोष्टीचा तपास व्यवस्थित झाला पाहिजे, ज्यांनी घटना केली त्यापेक्षा या घटनेच्या मागे कोणी आहे का हे बघणं काळाची गरज आहे. एखादा व्यक्ती येतो आणि डायरेक्ट संविधानाची तोडफोड करू शकतो असं कसं होतं. देशाचा कारभार संविधानावर चालतो आम्ही लोकप्रतिनिधी संविधानाला साक्ष ठेवून शपथ घेतो. संविधानाला हात घालणाऱ्या देशद्रोही म्हणता येईल आणि अशा देशद्रोही व्यक्तीला कठोर शासन झालं पाहिजे, अशी भूमिका जाधव यांनी यावेळी मांडली.
खासदार म्हणून मागीतली माफी
काही लोकांनी अतिरेक केला यात दुमत असण्याचे काही कारण नाही, नाहक काही. व्यापार्यांचे दुकान फुटली. काहींच्या गाड्या फुटल्या, काही लोकांना त्रास झाला, त्याबद्दल त्यांनी खासदार म्हणून माफी मागीतली. ज्या लोकांचा नुकसान झालं त्यांना लोकांना शासनाचे मदत झाली पाहिजे अशा स्वरूपाची विनंती त्यांनी शासनाकडे केली.
भाजपावर तुफान हल्लाबोल
दुपारी बांगलादेशातील हिंदूंना समर्थन देण्यासाठी मोर्चा काढला याला सगळ्यांचा पाठिंबा आहे. भारतीय जनता पार्टी हिंदूच्या नावाखाली एक वेगळा अजेंडा राबवत होती. बटेंगे तो कटेंग, एक है तो सेफ है हे नारे भारतीय जनता पार्टीचे होते हिंदू म्हणून नव्हते, असा टोला खासदार जाधव यांनी हाणला.
तुम्ही इथे सर्वांना हिंदू म्हणून एकत्रित येण्याचा आवाहन केलं होतं भारतीय जनता पार्टीच्या लोकांना बोलावलं नव्हतं. तुम्हाला हेच करायचं होतं तर फक्त भाजपाचे लोक बोलवायला हवे होते हिंदू म्हणून कशाला बोलावल होत, असा सवाल त्यांनी केला. बटेंगे तो कटेंगे, एक हे तो सेफ हे, आणि जेव्हा परभणीत हिंसाचार सुरू झाला. तेव्हा एक भी सेफ करायला पुढे आला नाही. परभणीत तोडफोड होत होती, गाड्या फोडत होते. लोकांना त्रास होता, भारतीय जनता पार्टीचा एकही मायका लाल पुढे आला नाही, असा खोचक टोला जाधवांनी लगावला.