Dhananjay Munde | परळी वैद्यनाथ हेच पाचवे ज्योतिर्लिंग, आमदार धनंजय मुंडेंनी पुन्हा ठणकावलं
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रसिद्ध कथाकार प.पु.प्रदीप मिश्रा यांच्यासमोर आंतरराष्ट्रीय कथा व्यासपीठावरुन परळी वैजनाथ हेच ज्योतिर्लिंग स्थान असल्याचे सांगितले आहे.
बीडः देशातील 12 ज्योतिर्लिंगांमध्ये पाचवे ज्योतिर्लिंग (Jyotirling) हे परळीत आहे किंवा नाही यावरून संभ्रम निर्माण करण्यात आला असून या वादात तथ्य नाही, असं वक्तव्य परळीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केलंय. परळीत आयोजित शिवमहापुराण कथेच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळीत (Parali) असलेले वैद्यनाथाचे मंदिर हेच पाचवे ज्योतिर्लिंग आहे. मात्र झारखंड येथील देवघरमध्ये पाचवे ज्योतिर्लिंग असल्याचा दावा काही जणांनी केलाय. यामुळे संभ्रम निर्माण झाला असून शासकीय पातळीवरदेखील या वादाचा फटका बसतो. विकास निधी तसेच तीर्थक्षेत्र विकास योजना राबवताना भेदभाव होतो, काही दिवसांपूर्वीच झारखंड येथे ज्योतिर्लिंग स्थान असल्याचे सांगत मोठा विकास निधी देण्यात आला. पण परळीतील ज्योतिर्लिंगाला निधी मिळाला नसल्याने धनंजय मुंडे यांनी नाराजी दर्शवली. तेव्हापासून पाचवे ज्योतिर्लिंग कोणते, यावरून चर्चा सुरु झाल्या आहेत. परळीतील एका धार्मिक कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी या वादावर पडदा पाडण्याचे आवाहन केले.
काय आहे नेमका वाद?
सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालम् ओंकारम् ममलेश्वरम्।।
परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमाशंकरम्। सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने।।
वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे। हिमालये तु केदारम् घृष्णेशं च शिवालये।।
एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति।।
12 ज्योतिर्लिंगांची महती सांगणाऱ्या परळी वैद्यनाथाचा उल्लेख आहे. तरीही झारखंडयेथील ज्योतिर्लिंग हे पाचवे असल्याचा दावा करण्यात येतो. काही दिवसांपूर्वी संकेश्वर पीठाधीश शंकराचार्य अभिनव विद्यानृसिंह स्वामी व अन्य संत-महंतांनी परळीतील धर्मसभेतदेखील हा संभ्रम दूर करण्याचा संकल्प केला होता. परळीतच पाचवे ज्योतिर्लिंग असल्याचा निर्वाळा त्यांनी केला होता.
धनंजय मुंडे काय म्हणाले?
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रसिद्ध कथाकार प.पु.प्रदीप मिश्रा यांच्यासमोर आंतरराष्ट्रीय कथा व्यासपीठावरुन परळी वैजनाथ हेच ज्योतिर्लिंग स्थान असल्याचे सांगितले आहे. परळी शहरात 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान मथुरा प्रतिष्ठान आयोजित अभिषेक शिवमहापुराण कथेचे आयोजन केले गेले आहे. आमदार धनंजय मुंडे या कथेचे स्वागताध्यक्ष आहेत. त्यांनी महाराजांचे स्वागत करत आपले मनोगत व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी खासदार प्रीतम मुंडेंवर निशाणा साधला होता. ते स्वतः मंत्री असताना राज्य शासनाकडून 133 कोटी रुपये तीर्क्षक्षेत्राच्या विकासासाठी मंजूर करून आणले. मात्र 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असूनही केंद्र सरकारचा निधी मिळवून देण्यात इथल्या लोकप्रतिनिधींना अपयश आल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं.