नवी मुंबईः दीड हजार रुपये द्या तरच शाळा सोडल्याचा दाखला मिळेल. हे शब्द नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांचे आहेत. तुर्भे शाळाचे मुख्याध्यापक दीपक बडगुजर यांनी चक्क 10 वी उत्तीर्ण होऊन शाळेचा दाखला काढायला आलेल्या विद्यार्थ्याला विचारले. शाळेचा दाखला मिळत नसल्याने हैराण झालेल्या या विद्यार्थ्याच्या आईने जेव्हा ही बाब समोर आणली, तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
नेरूळ येथे राहणाऱ्या जयश्री बागडे यांचा मुलगा मुकुंद बागडे हा गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्याने यंदा 17 क्रमांकाचा फॉर्म भरून बाहेरून परीक्षा दिली. दहावीच्या एसएससी बोर्डाचा अर्ज भरण्यासाठी त्याने महापालिकेच्या तुर्भेतील शाळेच्या केंद्रातून अर्ज भरला. अर्ज भरताना या विद्यार्थ्याला शाळेने नोंदणी शुल्क आणि परीक्षा शुल्क, असे एकूण दीड हजार रुपये भरायला सांगितले होते. त्यानंतर वर्षभरानंतर परीक्षा झाल्यावर पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी मुकुंदला दहावीचा शाळा सोडल्याचा दाखल्याची गरज होती. हा दाखला आणायला शाळेत गेल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक बडगुजर यांनी मुकुंदकडे दीड हजारांची मागणी केली.
आपण याआधीच दीड हजार रुपये दिले आहेत. आता परत कशासाठी हे मुकुंदने विचारल्यानंतर बडगुजर यांनी या पैशांपैकी 500 रुपयांचा दाखला आणि एक हजार रुपये मोठ्या साहेबाला देण्यासाठी असे सांगितले. गरिबीमुळे पैसे नसल्याने मुकुंदने पैसे नसल्याचे बडगुजर यांना सांगितले. मुकुंदने पैसे न दिल्यामुळे त्याला बडगुजर यांनी शाळा सोडल्याचा दाखला न देताच परत पाठवले. काही दिवस मुकुंद आणि त्याची आई जयश्री यांने शाळेचे उंबरटे झिझवले.
आपल्या पाल्याला शाळा सोडल्याचा दाखला मिळाला नाही, तर त्याचे भविष्याचे काय या विचाराने हैराण झालेल्या जयश्री यांनी पुन्हा शाळा गाठली. तेव्हा त्यांच्याकडेही बडगुजर यांनी पैसे मागितल्याने त्यांना धक्काच बसला. आम्ही गरीब असल्याने महापालिकेच्या शाळेत जातो. जर महापालिकेच्या शाळाही पैसे मागत असेल तर गरिबाने शिकायचे कुठे, असा प्रश्न मुकुंदची आई जयश्री यांनी उपस्थित केला.
कोविडमुळे यंदाच्या वर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न झाल्याने अंतर्गत मूल्यांकन करून गुण देण्यात आलेत. त्या गुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच उत्तीर्ण करण्यात आले. अंतर्गत गुण देताना नववी इयत्तेचे गुण आणि दहावीच्या वर्षभरातील गुण देण्यात शाळेचे महत्वाची भूमिका होती. याचा गैरफायदा घेऊन महापालिकेच्या तुर्भे शाळा क्रमांकचे शिक्षक शंकर कुसराम यांनी मुकुंद बागडे या दहावीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्याची आई जयश्री बागडे हिच्याकडे तब्बल पाच हजारांची मागणी केली होती. परंतु आपण परिस्थितीमुळे तेवढे पैसे देऊ शकलो नाही. याबाबत कुसराम यांनी बागडे यांनी लावलेले आरोप फेटाळले. फक्त अभ्यासक्रमासाठी लागणारी पुस्तके कोणती लागतील एवढेच सांगितल्याचे स्पष्ट केले. तर मुख्याध्यापक दीपक बडगुजर यांनी विद्यार्थ्याच्या आईने केलेले आरोप मान्य केले.
संबंधित बातम्या
नवी मुंबईत रेल्वे पाससाठी महापलिकेतर्फे 11 रेल्वे स्थानकांवर स्टॉल
रायगड काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात? पनवेलचा एक्का भारी की उरणचा?
Pay one and a half thousand rupees, only then will you get a certificate; says Navi Mumbai Municipal School teacher