‘कदाचित शूद्र आहे, महासंसद रत्न…,’ सुनील तटकरे यांची सुप्रिया सुळे यांच्यावर जळजळीत टीका

| Updated on: Nov 06, 2023 | 5:03 PM

अजितदादा यांच्या नेतृत्वात आम्ही एक वेगळा निर्णय घेतला. त्यामुळे राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली. आमची भूमिका गाव पातळीपर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही राज्यव्यापी दौरा करत आहे. घड्याळ तेच आहे, वेळ तीच आहे पण नवे पर्व सुरू केलं आहे असे तटकरे म्हणाले.

कदाचित शूद्र आहे, महासंसद रत्न..., सुनील तटकरे यांची सुप्रिया सुळे यांच्यावर जळजळीत टीका
SUNIL TATKARE VS SUPRIYA SULE
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

नागपूर | 5 नोव्हेंबर 2023 : महाराष्ट्राच्या जनतेची आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची एक इच्छा आहे की अजितदादा मुख्यमंत्री व्हावे. पूर्वी एकदा संधी आली होती. मात्र, आम्ही ते संधी घालवली. आम्ही आता एकत्र आलो आहोत. राज्यात पुन्हा सत्तेत महायुती म्हणून येणं हे आव्हान आहे. मंत्री दीपक केसरकर म्हणाले की एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवल्या जातील आणि त्यात यश मिळेल. ते अगदी योग्य बोलले आहेत. एनडीएचा घटक पक्ष म्हणून आम्ही निवडणूक एकत्रित लढणार आहोत, असे राष्ट्रवादीचे (अजितदादा गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.

2014 मध्ये भाजपने न मागता आम्ही पाठिंबा दिला

नागपूर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. राष्ट्रवादीची सगळी घोडदौड आम्ही बघितली आहे. 2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली. त्यांच्या मोठ्या प्रमाणात जागा आल्या. मात्र, मुख्यमंत्री पदावरून त्यांच्यात वाद झाला आणि राजकारण बदललं. 2019 मध्ये निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतली. 2014 मध्ये सुद्धा भाजपने न मागताही आम्ही पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता सामुदायिक निर्णय घेत सगळ्यांनी सत्तेत भाजपसोबत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असे तटकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

जागावाटप संदर्भात लवकर निर्णय होईल.

संघटनेचे पदाधिकारी यांच्या अशा भावना आहेत की त्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या कानावर ही बाब घातली आहे. राष्ट्रवादीची एकही जागा विदर्भात नाही. आताही 6 आमदार निवडून आले आहेत. जागावाटप संदर्भात लवकर निर्णय होईल. लोकसभेसाठी राष्ट्रवादीच्या जागा निश्चित झाल्यावर त्या निवडून येणे यावर लक्ष दिले पाहिजे असे मत तटकरे यांनी व्यक्त केले.

हे सुद्धा वाचा

राज्य सरकार सर्वच घटकांना न्याय

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारची भूमिका स्वच्छ आहे. सरकारची विनंती जरांगे पाटील यांनी मान्य केली. सरकार त्यांच्या भूमिकेनुसार आरक्षण देण्यासाठी पावलं उचलत आहे. एसटी कामगारांचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित होते. ते प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न होत आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी काही नव्याने भूमिका मांडली असेल. परंतु, राज्य सरकार सर्वच घटकांना न्याय देण्याचा काम करत आहे असे तटकरे म्हणाले.

मी कदाचित शूद्र आहे म्हणून त्या असं

खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जळजळीत टीका केली. महासंसद रत्न माझा तसा का उल्लेख करतात हे मला माहीत नाही. कदाचित मी सॉफ्ट टार्गेट असेल. शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेतात. पण, एखाद्या व्यक्तीचे नाव न घेता त्या काही बोलतात. त्यांना राग का आला हे माहीत नाही. न्यायालयात सुनावणी होती. मी टीप टॉप राहतो. पण, कुणी मळके कपडे घालत असेल. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. मात्र त्यानंतरही त्या सतत एक गृहस्थ म्हणतात. त्या असं का वागतात. मी कदाचित शूद्र आहे म्हणून त्या असं वागत असाव्या असा टोला त्यांनी लगावला.