नाशिक : नाशिकच्या देवळा तालुक्यातील फुलेमालवाडी ( Fulemalwadi ) गावचं गावकऱ्यांनी विकायला काढले आहे. गावकऱ्यांनी एकत्र येत याबाबत ठराव देखील केला आहे. शासनाकडे याबाबत गाव विकण्याबाबतचा ( Village Sell ) ठराव पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात या गावच्या निर्णयाची चर्चा होऊ लागली आहे. गावच्या या निर्णयामुळे शासकीय यंत्रणेसह लोकप्रतिनिधींची मोठी अडचण झाली आहे. मात्र, गावकऱ्यांवर गाव विकण्याची वेळ आली तरी का ? असा सवाल उपस्थित केला जात असतांना आश्चर्य वाटणारी ही बाब आहे. कुठल्याच शेतमालाला भाव मिळत नसल्याने वैतागलेल्या शेतकऱ्यांनी थेट शासनालाक गाव विकण्याचा निर्णय घेतला आहे.
खरंतर काही दिवसांपूर्वी गावात कुठल्याही सुविधा नाही म्हणून कर्नाटक आणि गुजरात मध्ये जाण्याचा काही गावकऱ्यांनी निर्धार केला होता. ग्रामपंचायतीचा ठरावही गावकऱ्यांनी करून शासनाकडे सुपूर्द केला. त्यामुळे संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला होता.
आता पुन्हा असाच काहीसा पवित्रा नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील फुलेमाळवाडी गावाने निर्णय घेतला आहे. यामध्ये शासनाला ठराव करून गाव विकण्याचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. एकूणच यामुळे फुलेमाळवाडी गाव चर्चेत आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शेतमालाला कवडीमोल भाव मिळत आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने गावकरी हतबल झाले आहे. गावकरी टोकाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत असतांना थेट सरकारलाच इशारा देण्यासाठी गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
गावातील शेतकरी कांदा, गहू, हरभरा यांसह भाजीपाला आणि नगदी पीक घेत आहे. गेल्या काही वर्षांपासून कुठल्याही पिकाला योग्य दर मिळत नाही. त्यामुळे शेतकरी वर्गासह संपूर्ण गावात प्रचंट असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे अनोख्या पद्धतीने गावकऱ्यांनी सरकारपर्यन्त निषेध नोंदविण्याचे काम केले आहे.
फुलेमाळवाडी गावात साधारणपणे 534 हेक्टर क्षेत्र आहे. संपूर्ण गाव शेती व्यवसाय करते. त्यामुळे मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन गरजाही पूर्ण करणे कठीण झाले आहे. त्यात शेतीला लागणारे भांडवल उभे कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाल्याने गावकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
सरकार शेतकाऱ्यांपेक्षा ग्राहक हिताला महत्व देत असल्याचा आरोप गावकरी करीत आहे. आणि त्याच कारणामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलतो. त्यामुळे गाव विकून त्यातील पैशाने आम्हाला जगता येईल असा निर्णय घेत गावकऱ्यांनी गाव विकण्याचा निर्णय घेतला आहे.
गावातील शेतकरी प्रवीण बागूल, अमोल बागूळ, राकेश सोनवणे, अविनाश बागूळ आणि अक्षय शेवाळे यांनी पुढाकार घेतला होता. गावातील सभामंडपात यावेळी सर्व ग्रामस्थ एकत्रित जमले होते. चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबतचा ठराव करण्यात आला आहे.