बाहेरुन पिझ्झा मागवल्याने विद्यार्थिनींना हॉस्टेलमधून बाहेर काढलं, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक प्रकार
या मुलींना हा नियम मोडत पिझ्झा मागवला. यामुळे कारवाई करण्यात आल्याचे विद्यार्थिनी आणि पालकांना एका लेखी पत्राद्वारे कळवण्यात आले आहे.

हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळी-अवेळी भूक लागते. अशावेळी काही विद्यार्थी सहज बाहेरुन जेवण किंवा काही पदार्थ ऑर्डर करतात. त्यात फास्ट फूडचे प्रमाणे हे सर्वाधिक असते. मात्र आता बाहेरुन पिझ्झा मागवून खाल्ल्याने काही विद्यार्थिनी या अडचणी सापडल्या आहेत. बाहेरुन पिझ्झा मागवल्याने समाजकल्याण वसतिगृहातून विद्यार्थिनींना हॉस्टेलमधून बाहेर काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
पिंपरी शहरातील मोशी परिसरात समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतीगृह आहे. या ठिकाणी राहत असलेल्या काही विद्यार्थिनींनी दोन दिवसांपूर्वी खाण्यासाठी पिझ्झा मागवला होता. त्याचवेळी ही बाब वसतिगृहाच्या गृहप्रमुख मिनाक्षी नारहारे यांना कळली. यानंतर त्यांनी एक अजब फतवा जारी करत पिझ्झा मागवणाऱ्या विद्यार्थिनींना हॉस्टेलबाहेर काढले.
एका खोलीत राहणाऱ्या चार विद्यार्थिनी पैकी नेमका पिझ्झा कुणी मागवला? हे स्पष्ट होत नसल्याचं कारण देत चौघींनाही एका महिन्यासाठी हॉस्टेलवर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मिनाक्षी नारहारे यांनी काढलेल्या या अजब फतव्याने समाज कल्याण विभाग देखील हारदलं आहे.
बाहेरील खाद्यपदार्थ आणण्यास बंदी
हॉस्टेलवर राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने बाहेरील व्यक्ती किंवा खाद्यपदार्थ आणण्यास नियमानुसार बंदी आहे. मात्र या मुलींना हा नियम मोडत पिझ्झा मागवला. यामुळे कारवाई करण्यात आल्याचे विद्यार्थिनी आणि पालकांना एका लेखी पत्राद्वारे कळवण्यात आले आहे.
मात्र या निर्णयावर पालकांनी संताप व्यक्त केला आहे. या अशा चुकांसाठी विद्यार्थिनींना प्रवेश बंदी करण्याचे आदेश सामजिक न्याय विभागाने परित केले आहेत का, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. त्यामुळे पालक संतप्त झाले आहेत. दरम्यान या घटनेनंतर पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे.