राजकारणाचा अजब डाव : हर्षवर्धन जाधव Vs पत्नी संजना जाधव Vs मुलगा आदित्य जाधव
हर्षवर्धन जाधव यांना सुरुवातीला उमेदवाराची शोधाशोध करावी लागल्याने ग्रामपंचायतीच्या राजकारणातून हर्षवर्धन जाधव बाद होणार का, अशी चर्चा होती
औरंगाबाद : औरंगाबादमधील माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshwardhan Jadhav) यांच्या राजकीय संन्यासानंतर त्यांचा नवा वारसदार कोण, याकडे सर्वांचे डोळे लागले होते. आधी जाधव यांच्या विभक्त पत्नी संजना जाधव (Sanjana Jadhav) यांच्याकडे समर्थकांच्या नजरा लागल्या होत्या. परंतु त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयानंतर चित्र पालटलं. आता त्यांचे पुत्र आदित्य जाधव यांनीच थेट रिंगणात उडी घेतली आहे. हर्षवर्धन जाधव यांचा मुलगा आदित्य जाधवने (Aditya Jadhav) कन्नडमधील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Gram Panchayat Election) वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली. (Pishor Gram Panchayat Election Harshwardhan Jadhav Vs Sanjana Jadhav Vs Aditya Jadhav)
पिशोर ग्रामपंचायतीसाठी आदित्यकडून पॅनलची घोषणा
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या पिशोर ग्रामपंचायतीमध्ये एक वेगळेच रंजक चित्र पाहायला मिळत आहे. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याच गावांमध्ये त्यांच्या पत्नीने स्वतःचं एक पॅनल उभं केलं आहे. हर्षवर्धन जाधव यांना सुरुवातीला उमेदवाराची शोधाशोध करावी लागल्याने ग्रामपंचायतीच्या राजकारणातून हर्षवर्धन जाधव बाद होणार का, अशी चर्चा होती. मात्र त्यांच्या मुलाने ऐनवेळी एन्ट्री घेत रंगत वाढवली आहे.
रायभान जाधवांची तिसरी पिढी सक्रिय
अकरावीत शिकणाऱ्या आदित्य जाधवने आईविरोधात रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे काँग्रेस नेते रायभान जाधव यांची तिसरी पिढी सक्रिय राजकारणात उतरताना दिसत आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुका लढवणार असल्याची घोषणाही त्याने पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे आदित्यच्या पाठीशी वडील संपूर्ण ताकद लावणार असल्याचं निश्चित झालं आहे.
जावई vs सासरे
हर्षवर्धन जाधव, संजना जाधव आणि रावसाहेब दानवे यांचे नातेसंबंध एव्हाना संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालेले आहे. हर्षवर्धन जाधव हे रावसाहेब दानवे यांचे जावई, तर संजना जाधव यांचे पती. हर्षवर्धन जाधव यांनी अनेक वेळा रावसाहेब दानवे यांच्यावर बेछूट आरोप केलेले आहेत. त्यामुळे सासरे-जावई यांच्यातील वाद सर्वदूर पोहोचला आहे.
पिशोर ग्रामपंचायत ही औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत आहे. यात सहा प्रभाग असून सतरा सदस्यांची ही ग्रामपंचायत आहे. महत्त्वाचं म्हणजे या ग्रामपंचायतीवर ज्यांचं वर्चस्व असेल, त्यांचीच सत्ता वर्षभर तालुक्यावरही असते. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून हर्षवर्धन जाधव यांनी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवली होती.
नारायण मोकाशींसोबत वितुष्ट
सरपंच नारायण मोकाशी हे हर्षवर्धन जाधव यांच्या वतीने ग्रामपंचायतीचा कारभार चालवायचे, मात्र नारायण मोकाशी यांच्यावर काही दिवसापूर्वी अविश्वास ठराव आला. त्यामुळे नारायण मोकाशी आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात वितुष्ट निर्माण झालं. परिणामी हर्षवर्धन जाधव यांच्या हातातून पिशोर ग्रामपंचायत यावेळेला नारायण मोकाशी यांनी स्वतःचा सवतासुभा मांडला आहे. दुसर्या बाजूला बाळासाहेब जाधव नावाच्या एका विश्वासू सहकाऱ्याला सोबत घेऊन संजना जाधव यांनी निवडणुकीमध्ये आपल्या पॅनल पूर्ण केला आहे.
हर्षवर्धन जाधव समस्यांच्या गर्तेत
हर्षवर्धन जाधव नुकतेच विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यासोबतच पुण्यात एका वृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांना नुकतीच अटक सुद्धा झालेली आहे. संजना जाधव यांना काडीमोड देण्याचा सुद्धा त्यांनी निर्णय घेतल्यामुळे जाधव आणि दानवे कुटुंबाचे संबंध टोकाचे ताणले गेलेले आहेत. त्यामुळे सुद्धा हर्षवर्धन जाधव समस्यांच्या गर्तेत अडकले आहेत.
हर्षवर्धन जाधव समस्यांच्या गर्तेत अडकत असताना दुसऱ्या बाजूला रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्याकडे कन्नड तालुका नेता म्हणून पाहू लागले आहेत. त्यामुळेच संजना जाधव यांचेही या निवडणुकीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. संजना जाधव जर या निवडणुकीमध्ये यशस्वी झाल्या आणि पिशोर ग्रामपंचायतीवर त्यांचा सरपंच बसला तर संजना जाधव यांचा कन्नड तालुक्यातील विधानसभेचा मार्ग मोकळा होणार आहे. (Pishor Gram Panchayat Election Harshwardhan Jadhav Vs Sanjana Jadhav Vs Aditya Jadhav)
कोण आहेत हर्षवर्धन जाधव?
- हर्षवर्धन जाधव हे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई
- काँग्रेस नेते रायभान जाधव यांचे हर्षवर्धन हे पुत्र
- हर्षवर्धन जाधव हे 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर कन्नड विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते.
- पाच वर्षांच्या आत त्यांनी पक्षांतर्गत मतभेदामुळे मनसेला सोडचिठ्ठी दिली होती.
- मनसे सोडल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
- 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला.
- 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही हर्षवर्धन जाधव यांना विजय मिळवता आला नाही.
- शिवसेनेच्या उदयसिंग राजपूत यांनी त्यांचा पराभव केला.
संबंधित बातम्या :
हर्षवर्धन जाधवांच्या राजकारणाचा अस्त तर संजना जाधवांचा उदय? पिशोर ग्रामपंचायतीचा सविस्तर रिपोर्ट
“मला दानवेंचा जावई म्हणू नका” माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा घटस्फोटासाठी अर्ज
(Pishor Gram Panchayat Election Harshwardhan Jadhav Vs Sanjana Jadhav Vs Aditya Jadhav)