झोमॅटोवरुन मागवलेल्या पनीर चिलीत प्लॅस्टीकचे तुकडे
औरंगाबाद : झोमॅटो या फूड डिलिव्हरी अॅपवरुन पनीर चिली मागवली, मात्र त्यात चक्क प्लॅस्टीकचे तुकडे निघाल्याचं समोर आलं आहे. औरंगाबादेत हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ग्राहकाच्या डब्यातून चोरुन पदार्थ खाणाऱ्या डिलिव्हरी बॉयच्या प्रकरणानंतर आता पदार्थात प्लॅस्टीक निघाल्याने झोमॅटो कंपनी पुन्हा एकदा वादात अडकली आहे. औरंगाबाद शहरातील सचिन जमधडे यांनी झोमॅटो अॅपवरुन काही पदार्थ ऑर्डर […]
औरंगाबाद : झोमॅटो या फूड डिलिव्हरी अॅपवरुन पनीर चिली मागवली, मात्र त्यात चक्क प्लॅस्टीकचे तुकडे निघाल्याचं समोर आलं आहे. औरंगाबादेत हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ग्राहकाच्या डब्यातून चोरुन पदार्थ खाणाऱ्या डिलिव्हरी बॉयच्या प्रकरणानंतर आता पदार्थात प्लॅस्टीक निघाल्याने झोमॅटो कंपनी पुन्हा एकदा वादात अडकली आहे.
औरंगाबाद शहरातील सचिन जमधडे यांनी झोमॅटो अॅपवरुन काही पदार्थ ऑर्डर केले, त्यापैकी एक पदार्थ पनीर चिली होता. डिलिव्हरी बॉयने घरी ते सर्व पदार्थ आणून दिले. जेवत असताना पनीर चिलीमधील पनीर तुटत नसल्याचं सचिनच्या लक्षात आलं. सुरुवातीला त्यांना काहीही कळाले नाही. मात्र निरखून बघितले असता तो पदार्थ मुळात पनीर नसून प्लॅस्टीक सदृश्य प्रकार असल्याचं त्यांना समजलं. त्यानंतर सचिन यांनी थेट हॉटेल एस स्क्वेअर गाठलं, याच हॉटेलमधून हा पदार्थ मागवण्यात आला होता. त्यांनी हॉटेल चालकाला याबाबत विचारपूस केली. मात्र, हॉटेल चालकाने त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे सचिन यांनी थेट जिन्सी पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली.
पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तक्रार नोंदवली. प्लॅस्टीक सदृश्य दिसणाऱ्या या पनीरला पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन (एफडीए)कडे तपासणीसाठी पाठवले आहे.
काही दिवसांपूर्वीच झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात तो डिलिव्हरी बॉय ग्राहकांनी ऑर्डर केलेले पदार्थ रस्त्याच्या कडेला थांबून खात असल्याचं या व्हिडीओत समोर आलं होतं. त्यानंतर झोमॅटोला लोकांच्या टीकेला सोमोरे जावं लागलं होतं. झोमॅटोने त्या डिलिव्हरी बॉयवर कारवाईही केली होती.
आता या प्लॅस्टीक पनीरमुळे झोमॅटो कंपनी पुन्हा एकदा वादात अडकली आहे. आजच्या ऑनलाईनच्या जगात आपण प्रत्येक गोष्टीसाठी झोमॅटोसारख्या ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या कपंन्यांवर अवलंबून असतो. मात्र आता या फूड डिलिव्हरी कंपनींवर किती विश्वास ठेवावा हा मोठा प्रश्न ग्राहकांसमोर आहे.