मोदींचा नागपूर दौरा रद्द, औरंगाबाद आणि मुंबईत विविध प्रकल्पांचा शुभारंभ
नागपुरात मोदींकडून मेट्रोचं लोकार्पण केलं जाणार होतं. दौरा रद्द झाल्याच्या वृत्ताला भाजपकडूनही दुजोरा देण्यात आलाय. त्यामुळे मोदी फक्त औरंगाबाद आणि मुंबईतील कार्यक्रमालाच (PM Modi Maharashtra visit) हजेरी लावणार आहेत.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दिवसभर महाराष्ट्र दौऱ्यावर (PM Modi Maharashtra visit) असतील. यामध्ये ते नागपूर, औरंगाबाद आणि मुंबईत विविध कार्यक्रमांना हजेरी लावणं अपेक्षित होतं. पण नागपुरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे मोदींचा दौरा रद्द करण्यात आलाय. नागपुरात मोदींकडून मेट्रोचं लोकार्पण केलं जाणार होतं. दौरा रद्द झाल्याच्या वृत्ताला भाजपकडूनही दुजोरा देण्यात आलाय. त्यामुळे मोदी फक्त औरंगाबाद आणि मुंबईतील कार्यक्रमालाच (PM Modi Maharashtra visit) हजेरी लावणार आहेत.
मुंबईतील कार्यक्रमावर शिवसेना खासदाराची नाराजी
मुंबईत मोदींच्या हस्ते मेट्रो प्रकल्प भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. पण पत्रिकेत नावाचा उल्लेख नसल्याबद्दल शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी आक्षेप घेतलाय. बीकेसी येथे होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं भूमीपूजन केलं जाणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण पत्रिकेत स्थान देण्यात आलं असून ते विशेष अतिथी आहेत.
वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मेट्रो 11 प्रकल्पासाठी आपण पाठपुरावा केल्याचा शेवाळे यांचा दावा दावा आहे. माझ्या दक्षिण मध्य मतदार संघातून मेट्रो 11 धावणार आहे. त्यामुळे निमंत्रण पत्रिकेत माझं नाव असणं आवश्यक होतं, अशी भूमिका राहुल शेवाळे यांनी घेतली. दरम्यान, शेवाळे यांना MMRC कडून कार्यक्रमाचं रितसर आंमत्रण मिळाल्याने ते कार्यक्रमाला जाणार आहेत.
औरंगाबादेत इम्तियाज जलील यांचा विरोध
पंतप्रधान मोदींचा औरंगाबादमध्येही कार्यक्रम होणार आहे. पण एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मोदींना काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) द्वारे शनिवारी दुपारी 12.30 वाजता DMIC, शेंद्रे, औरंगाबाद येथे “सक्षम महिला मेळावा” चं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे महिलांना संबोधित करणार आहेत.