“तुकडे तुकडे गँग, अर्बन नक्षली काँग्रेस चालवत आहेत”; नरेंद्र मोदी यांचा जोरदार हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पी एम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त वर्ध्यामध्ये आले होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
PM Narendra Modi Criticise Congress : “काँग्रेसने तेलंगणात कर्जमाफीची घोषणा केली. त्यांचं सरकार आलं. पण त्यांनी कर्जमाफ केलं नाही. महाराष्ट्रात आपल्याला त्यांच्या धोकेबाजीपासून सावध राहिलं पाहिजे”, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पी एम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त वर्ध्यामध्ये आले होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहे. पी एम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा आज वर्ध्यात पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध योजनांचे लोकापर्ण करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.
“धोकेबाजीपासून सावध राहिलं पाहिजे”
आम्ही अनेक निर्णय घेतले. पण मध्ये एक सरकार आलं आणि त्यांनी सर्व थांबवलं. ज्या काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या मित्रांनी शेतकऱ्यांना बर्बाद केलं. त्यांना परत संधी द्यायची नाही. काँग्रेसचा एकच हेतू आहे, खोटं, फसवणूक आणि बेईमानी आहे. काँग्रेसने तेलंगणात कर्जमाफीची घोषणा केली. त्यांचं सरकार आलं. पण त्यांनी कर्जमाफ केलं नाही. महाराष्ट्रात आपल्याला त्यांच्या धोकेबाजीपासून सावध राहिलं पाहिजे, असा सल्ला पंतप्रधान मोदींनी दिला.
“काँग्रेस ही देशातील सर्वात भ्रष्ट आणि बेईमान पार्टी”
आज जी काँग्रेस आहे, ती गांधींची नाही. आजच्या कांग्रेसमध्ये देशभक्तीची आत्मा मेली आहे. आजच्या काँग्रेसमध्ये द्वेषाचं भूत आहे. आज काँग्रेसच्य़ा लोकांची भाषा पाहा. परदेशात जाऊन त्यांचे देशविरोधी अजेंडे सुरू आहेत. समाजाला तोडणं, देशात फूट पाडण्यावर बोलत असतात. तुकडे तुकडे गँग आणि अर्बन नक्षली लोक काँग्रेस चालवत आहे. देशातील सर्वात भ्रष्ट आणि बेईमान पार्टी काँग्रेस आहे. देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब हे काँग्रेसचं शाही कुटुंब आहे. ज्या पार्टीत आपल्या अस्था असेल ती पार्टी गणपती पूजेचा विरोध करणार नाही. पण आजच्या काँग्रेसला गणपती पूजेला विरोध आहे, असा घणाघातही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.