PM Narendra Modi : पावसाचा फटका… अखेर नरेंद्र मोदी यांचा पुण्याचा दौरा रद्द
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. पावसाच्या सावटामुळे पंतप्रधानांचा हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. पावसाच्या सावटामुळे पंतप्रधानांचा हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील विविध विकासकामांचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण पार पडणार होतं. तसेच आज संध्याकाळी त्यांची एसपी कॉलेजच्या मैदानावर जाहीर सभा देखील होणार होती.विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हाँ महत्वपूर्ण दौरा होता. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे आता मोदींचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा आता कोणत्याही क्षणी होऊ शकते. अवघ्या 2 महिन्यांवर आलेल्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले असून राष्ट्रीय नेतृत्वांचेही महाराष्ट्र दौरे सुरू झाले आहेत. गेल्या काही दिवसांत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे महाराष्ट्रात अनेकदा आगमन झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह किंवा जेपी नड्डा असोत, काही दिवसांत ते महाराष्ट्रात येऊन गेले आहेत.
आज पुन्हा पंतप्रधान मोदी पुण्याच्या दौऱ्यावर येणार होते. पुणे मेट्रोच्या सिव्हील कोर्ट ते स्वारगेट या टप्प्याचे तसेच विविध विकासकामांचे त्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार होते. तसेच पुण्यातील तसेच एसपी कॉलेजमध्ये त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. तेथे ते पु्णेकरांना संबोधित करणार होते. मात्र त्यांच्या या सभेवर पावसाचे सावट घोंगावत होते. त्यामुळे अखेर मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. पुढल्या आठवड्यात त्यांचा हा दौरा पुन्हा नियोजित केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे .
पर्यायी जागेचाही शोध
राज्यभरात कालपासून मुसळधार पाऊस बुधवारी पुण्यातही जोरदार पाऊस झाला. त्याच पावसामुळे मोदींच्या सभेतही खंड पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यामुळे पर्यायी जागांचा शोध घेऊन सभेसाठी तेथेही चाचपणी करण्यात आली होती.
एस.पी. कॉलेजच्या प्रांगणात जिथे मोदींची सभा होणार होती, तेथे पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झाला असून सततच्या पावसाने मंडप संपूर्ण ओलाचिंब झाला. सगळीकडेच चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींची सभा कशी होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र याला पर्याय म्हणून दुसऱ्या जागांची चाचपणी सुरू आहे. आजही पाऊस आला तर नरेंद्र मोदी यांची सभा स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा सभागृहात घेण्यासाठी भाजपकडून तयारी करण्यात होती. मात्र आता पंतप्रधान मोदींचा आजचा संपूर्ण दौराच रद्द झाला आहे.
पावसाचा धडाका
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. त्यामुळे हवामान विभागाने 27 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवला. गुरुवारी पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता आहे.