पोलिसांना हवाय ‘गोल्डन शर्ट’ गुन्हे शाखा ‘गोल्डन शर्ट’च्या शोधात; गोल्डन शर्ट शोधण्यामागील कारण आहे तरी काय?
संस्थेच्या ठेवी नियमबाह्य पद्धतीने कर्जाच्या स्वरूपात वाटप केल्याने पतसंस्थेची आर्थिक परिस्थिती ढासळली होती. त्यावरून ठेवीदारांनी पोलिसांत धाव घेतली होती.
नाशिक : नाशिकच्या येवला तालुक्यातील कै. पारख पतसंस्थेतील जवळपास 22 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी (Nashik Crime) संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष असलेल्या पंकज पारख (GoldenMan Pankaj Parakh) यांना पोलीसांनी अटक केली आहे. तब्बल चौदा महीने पोलिसांना पंकज पारख हा गुंगारा देत होता. त्याला गुन्हे शाखेच्या (Nashik Police) पथकाने तिडके कॉलनीपरिसरात एका कारमध्ये असतांना अटक केली आहे. पंकज पारख यांची गोल्डन मॅन म्हणून संपूर्ण राज्यभर ओळख आहे. पंकज पारख हे मोठे कापड व्यावसायिक सुद्धा आहे. याशिवाय पंकज पारख हे येवला नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत. त्यामुळे पारख यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक का होत नाही? अशी चर्चा गेले अनेक महीने सुरू असतांना नाशिक ग्रामीण पोलीसांनी त्यांना अटक केली आहे.
येवला येथे पंकज पारख यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने पतसंस्था सुरू केली होती. यामध्ये पंकज पारख यांनी नागरिकांनी ठेवलेल्या ठेवी कर्जस्वरूपात वाटप केल्या होत्या.
संस्थेच्या ठेवी नियमबाह्य पद्धतीने कर्जाच्या स्वरूपात वाटप केल्याने पतसंस्थेची आर्थिक परिस्थिती ढासळली होती. त्यावरून ठेवीदारांनी पोलिसांत धाव घेतली होती.
सहनिबंधक यांच्या माध्यमातून पतसंस्थेची चौकशी पार पडली होती, त्यानंतर संचालक मंडळ बरखास्त झालं, त्यानंतर प्रशासक नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर सहनिबंधक यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला होता.
पंकज पारख यांच्यासह इतर 17 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ते पंकज पारख याच्यासह संचालक मंडल फरार होते. त्यानंतर चौदा महिन्यांनी पंकज पारख पोलीसांच्या हाती लागला आहे.
त्यात पंकज पारख याने काही वर्षांपूर्वी आपल्या वाढदिवसाला सोन्याचा शर्ट विकत घेतला होता, त्यामुळे गोल्डन मॅन म्हणून पंकज पारख याची संपूर्ण राज्यभर ओळख झाली होती.
नाशिकच्या सराफाकडून पंकज पारख याने चार किलो सोन्याचा सव्वा कोटी रुपयांचा सोन्याचा शर्ट शिवून घेतला होता, त्यामुळे त्याला अटक झाल्यानंतर पोलीस त्या शर्टचा शोध घेत आहे.
पंकज पारखला अटक झाल्यानंतर सोन्याच्या शर्टची मोठी चर्चा झाली होती, त्याच पार्श्वभूमीवर पंकज पारख याचा सोन्याचा शर्ट कुठे आहे? तो विकला आहे की लपून ठेवला आहे? याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
पंकज पारख याला अटक झाल्यानंतर संपूर्ण राज्यभर चर्चा झाली होती. त्यात राजकीय वर्तुळात देखील पंकज पारख चर्चेचा विषय आहे. त्यामुळे पोलीस पारखच्या घराची झाडाझडती घेण्याची शक्यता आहे.
याशिवाय पंकज पारख यांचा अत्यंत जवळची व्यक्ती असलेल्या अजय जैन यांचाही पोलीस शोध घेत असून अजय जैन हे पतसंस्थेचा व्यवस्थापक होते, त्यामुळे पारख घोटाळ्यात मोठी माहिती समोर येणार आहे.