“मापात पाप दाखवा आणि 2 लाख रुपये घेऊन जा”; पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ साखर कारखान्याचा वाद पेटला
राजाराम कारखान्याच्या वजन काट्यावर अचूक वजन येतं याची सभासदांना खात्री आहे. त्यामुळे स्वतःच्या कारखान्यावर मापात पाप करणाऱ्यांनी राजाराम कारखान्याच्या वजन काट्याबाबत बोलू नये असा टोला महाडिकांनी लगावला आहे.
कोल्हापूर : राजाराम साखर कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला आहे. शेतकऱ्यांच्या उसाला वेळेवर तोड देऊन दिलासा दिला आहे. राजाराम कारखान्याच्या वजन काट्यावर अचूक वजन येतं याची सभासदांना खात्री आहे. त्यामुळे स्वतःच्या कारखान्यावर मापात पाप करणाऱ्यांनी राजाराम कारखान्याच्या वजन काट्याबाबत बोलू नये असा टोला अमल महाडिक यांनी विरोधकांना लगावला. हातकणंगले तालुक्यातील नागाव येथे झालेल्या राजारामच्या सभासदांच्या बैठकीत ते बोलत होते.
राजाराम कारखान्याच्या वजन काट्याच्या वजनात चूक दाखवा मी 2 लाख रुपये बक्षीस द्यायला तयार आहे असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले.
विरोधकांच्या कारखान्यात बाराशे किलोचा एक टन मोजला जातो अशी चर्चा असल्याचेही महाडिक यांनी यावेळी सांगितले.
आम्ही सभासदांना अल्पदरात देत असलेली साखर पाहून विरोधकांचे तोंड कडू झाले आहे असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
यावेळी बोलताना कारखान्याचे माजी अध्यक्ष शिवाजी रामा पाटील यांनी सर्जेराव माने यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला. सर्जेराव माने तुम्ही चेअरमन स्वतः होता तरीही तुम्ही कारखान्याच्या विरोधात बोलत आहात.
तुमच्यासाठी आणखी काय करायला हवं होतं? असा थेट सवाल शिवाजी पाटील यांनी केला आहे. सर्जेराव तुम्ही तर सरडे राव आहात असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
यावेळी अरुण माळी, किरण मिठारी,बाबासो पाटील,गणपती माळी, विजय पाटील,अशोक ऐतवडे, कुमार राठोड, सागर गुडाळे, संतोष पाथरे, भीमराव खाडे, प्रकाश पोवार, किशोर शिंगे, महादेव पोवार, ज्ञानू सावंत यांच्यासह मान्यवर आणि सभासद उपस्थित होते.
राजाराम साखर कारखानाच्या आरोप प्रत्यारोपामुळे कोल्हापूरातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे आता याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.