बिल थकले, फोन कनेक्शन कापले, इंटरनेट बंद, 23 दिवसांपासून पोस्टाचे व्यवहार ठप्प
पोस्टाचे खातेदार वाढले आणि व्यवहारही वाढला आहे. परंतु इंटरनेट सेवा ठप्प असल्याने पोस्ट खातेदारांचे नुकसान होत आहे. काहींना आपल्या विमा पॉलीसीचे प्रिमियम भरता येत नाही. त्यामुळे त्यांना दंड बसणार आहे.
निलेश डाहाट, चंद्रपूर : शासकीय खात्याची व्यवस्था अजूनही जुन्या पद्धतीच सुरु आहे. यामुळे कधी वीज कनेक्शन तोडले जाते, कधी अधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याची कारवाई केली जाते. त्याचा परिणाम अर्थात जनतेच्या कामांवर होत असतो. शहरापेक्षा ग्रामीण भागात ही परिस्थिती अधिकच बिकट आहे. तब्बल 23 दिवसांपासून बिल थकल्यामुळे इंटरनेट कापले गेले. अन् पोस्टाचे सर्व कामकाज ठप्प झाले.
आधुनिकरणाचे वारे हळूहळू सर्वत्र पोहचले. सर्वच शासकीय विभागाचे काम आता इंटरनेटशिवाय होत नाही. ग्रामीण भागातील गावागावात असलेले पोस्ट विभागाच्या सर्वच कामांना आता इंटरनेट हवे असते. पोस्ट बँक झाल्यापासून केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांमध्ये थेट सहभाग पोस्टमार्फत दिला जाऊ लागला. तसेचृ पोस्ट विभागाने कात टाकत काळनुरुप बदल केला. यामुळे पोस्ट विभागाला चांगलेच महत्व आले. पुन्हा पोस्टात गर्दी दिसू लागली. विविध योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी जनता जाऊ लागली,.
का कापले कनेक्शन
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली शहरातील पोस्टाचे इंटरनेट कनेक्शन कापले गेले आहे. यामुळे गेल्या 23 दिवसांपासून पोस्टातील व्यवहार ठप्प झाले आहे. नोव्हेंबर महिन्यांपासून दूरसंचार विभागाचे बिल भरले नाही. बिल किती 4 हजार 972 रुपये. परंतु हे बिल वेळेवर भरले नाही. मग दूरसंचार विभागाने आपले कर्तव्य बजावले. अन् नऊ जानेवारीला कनेक्शन कापले. तेव्हापासून आजपर्यंत येथील काम थांबले. या कार्यालयातील पोस्टाच्या सर्व सेवा ठप्प झाल्या आहेत.
कामकाज थांबले
पोस्टाचे खातेदार वाढले आणि व्यवहारही वाढला आहे. परंतु इंटरनेट सेवा ठप्प असल्याने पोस्ट खातेदारांचे नुकसान होत आहे. काहींना आपल्या विमा पॉलीसीचे प्रिमियम भरता येत नाही. त्यामुळे त्यांना दंड बसणार आहे. आरडी व पोस्ट बँकेचे सर्व व्यवहार थांबले आहे. त्याचा मनस्ताप खातेदारांना सोसावा लागत आहे. आता दूरसंचार विभागाचे बिल भरून सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी पोस्ट खातेदारकाकडून केली जात आहे.