राज्यात बर्ड फ्लूच्या अफवेने शेतकऱ्यावर संकट, पोल्ट्री व्यावसायिकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ
आधीच कोरोनाने कंबरडं मोडलेल्या परिस्थितीत बर्ड फ्लूच्या संसर्गाने शेतकरी आणि व्यापाऱ्यांसमोर नवं संकटं उभं केलंय.
मुंबई : आधीच कोरोनाने कंबरडं मोडलेल्या परिस्थितीत बर्ड फ्लूच्या संसर्गाने शेतकरी आणि व्यापाऱ्यांसमोर नवं संकटं उभं केलंय. मुंबई, ठाणे, परभणी, बीड आणि रत्नागिरी या 5 जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू संसर्ग असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, याचा परिणाम केवळ या 5 ठिकाणी झालेला नसून संपूर्ण राज्यात झालाय. राज्यभरात बर्ड फ्लूच्या भीतीने लोकांनी चिकन आणि अंडी खाणं बंद केलंय (Poultry Farmer Eggs and Chicken Traders in trouble due to Bird Flu in Maharashtra).
बर्ड फ्लूच्या भीतीने नागरिकांना चिकन आणि अंडी खाणं बंद केल्याने अचानकपणे बाजारातील अंडी आणि चिकनच्या मागणीत घट झालीय. त्यामुळे चिकन आणि अंड्यांचे भाव घसरलेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत असून ईएमआय भरण्याचं त्यांच्यावर संकट ओढवलं आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्ल्यू नाही तिथेही लोक चिकन-अंडी खरेदी करणं टाळत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांबरोबरच कुकटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचाही व्यवसाय अडचणीत सापडलाय.
उपजीविका आणि कमाईचे धंदेच बंद पडण्याच्या स्थितीमुळे शेतकरी आणि व्यावसायिकांना कर्जाचे हप्ते (ईएमआय) भरणे देखील कठीण झालंय. शेतकऱ्यांवर कोरोनानंतर लगेचच हे संकट ओढावल्याने त्यांचं कंबरडं मोडण्याची वेळ आलीय. पोल्ट्री व्यावसायिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे.
दरवर्षी कुठल्या ना कुठल्या राज्यात बर्ड फ्लूच्या अफवा उठतात. त्याचा परिणाम थेट पशूपालन आणि पोल्ट्री उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांवर होतो. कोंबड्यांचे दर पडतात. लाखो कोंबड्या मारल्या जातात आणि लाखो शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं. बर्ड फ्लूमुळं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण पाहिलं, तर ते अतिशय कमी आहे. मात्र, त्याचा प्रसार होऊ न देणंही तितकेच महत्त्वाचा आहे.
ठळक बातम्या, बेधडक विश्लेषण, पाहा 8 PM स्पेशल रिपोर्ट, टीव्ही 9 मराठीवर
राज्यात बर्ड फ्लूने शिरकाव जरी केला असला तरी अद्यापही धुळे, नंदुरबार, जळगाव या तिन्ही जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू आढळून आला नाही, मात्र, सोशल मीडियावर बर्ड फ्लू इतर पक्षांमध्ये आढळून आल्याची अफवा वाऱ्यासारखी फिरत आहे. धुळे जिल्ह्यात सतर्कता बाळगण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजना करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्यावतीने 18 रॅपिड अॅक्शन फोर्सची पथक तयार करण्यात आली आहेत. या पथकाच्या माध्यमातून जिल्ह्यात काटेकोरपणे उपाय योजना करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपउपायुक्त डॉ. संजय विसावे यांनी दिली.
‘अव्वाच्या सव्वा वाढलेले मटणाचे दर नियंत्रित करा’
दुसरीकडे चिकन आणि अंड्यांची मागणी घटल्याने आता मटणाची मागणी वाढत आहे. त्यामुळे मटणाच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. त्याविरोधात नागरिक मैदानात उतरले आहेत. मटणाचे दर रद्द करावेत या मागणीसाठी मटणप्रेमी आणि स्वाभिमान कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिलंय. यवतमाळमध्ये 800 रुपयांना 1 किलो या प्रमाणे मटण विक्री होत आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांची लूट थांबवावी अशी मागणी होत आहे.
हेही वाचा :
यवतमाळमध्ये कोल्हापूर पॅटर्न, मटणाचे दर नियंत्रित करा, मटणप्रेमींची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
नागपुरात विचित्र घटना; डीजेच्या आवाजामुळे कोंबड्यांचा मृत्यू?
बर्ड फ्ल्यूमुळे अंडी आणि चिकनकडे पाठ; खवय्यांचा मटण आणि माशांवर ताव!
Poultry Farmer Eggs and Chicken Traders in trouble due to Bird Flu in Maharashtra