Prajakta Mali PC : प्राजक्ता माळींनी सुरेश धसांना सुनावलं, म्हणाल्या माझ्या चारित्र्यावर…
सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळी यांनी आज पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.
काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली. हे प्रकरण आमदार सुरेश धस यांनी चांगलंच उचलून धरलं आहे. या प्रकरणावर बोलताना सुरेश धस यांच्याकडून सातत्यानं आकाचा उल्लेख करण्यात येतो, मात्र हे आका कोण याबाबत सुरेश धस यांच्याकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र या प्रकरणावर बोलताना सुरेश धस यांचा रोख हा मंत्री धनंजय मुंडेंकडे असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान या प्रकरणावर बोलताना सुरेश धस यांच्याकडून तीन अभिनेत्रींचा उल्लेख करण्यात आला. यामध्ये प्राजक्ता माळी यांचं नाव देखील होतं. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यानंतर आता प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेऊन सुरेश धस यांना चांगलंच सुनावलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या प्राजक्ता माळी?
आपण का जमलो हा विषय तुम्हाला माहीत आहे. बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांनी काल प्रसार माध्यमांशी बोलताना जी टिप्पणी केली. त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी इथे आले आहे. दीड महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. दीड महिने मी शांतपणे सामोरे जात आहे. ट्रोलिंगला, निगेटिव्ह कमेंटला मी शांतपणे सामोरे जात आहे. शांतता ही माझी मुक संमती नाही. माझ्यासारख्या अनेक महिला, कलाकार यांची ही हतबलता आहे. आता हे शांत राहणं तुमच्यामुळे आमच्यावर बेतलं आहे. एक व्यक्ती रागाच्या भरात उद्वेगाच्या भरात काही तरी बरळून जाते. त्या दोन वाक्याचे मीडियामध्ये हजारो व्हिडीओ बनवले जातात. चिखल फेक सुरू राहाते. महिलांची अब्रू निघत राहते. यांचं मनोरंजन होतं. हे होऊ नये. समाज माध्यमांसमोर चिखलफेक होऊ नये, म्हणून मी यात पडले नाही. या गटारात दगड टाकणं योग्य वाटलं नाही.
या आवया जशा उठताता तशा निघून जातात, घरच्यांचा, सहकाऱ्यांचा माझ्यावर एवढा दांडगा विश्वास होता की मला माझ्या चारित्र्याचा खुलासा करण्यासाठी पुढे यावं याची कधी गरज वाटली नाही. मात्र आज ही वेळ आलीये. ही अत्यंत नामुष्की आहे. कारण लोकप्रतिनिधी त्यावर प्रतिक्रिया देतात. रुमरला स्थान नाही. पण वावटळीवर लोकप्रतिनीधी बोलतात. ज्यांना आपण निवडून दिलं. ज्यांनी विधीमंडळात बोलावं, आपल्या हक्कांचं रक्षण करावं, आपल्यासाठी न्याय मागावा, अशी आपली ज्यांच्याकडून अपेक्षा आहे, अशी मंडळी जेव्हा चिखलफेक करतात तेव्हा ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची वेळ येते, असं प्राजत्का माळी यांनी म्हटलं आहे.