इंडिया बैठकीवरून प्रकाश आंबेडकर यांचा कॉंग्रेसला टोला, म्हणाले ‘उद्धव ठाकरे वकील…’
इंडिया आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आले नाही. यावरुन आंबेडकर यांनी कॉंग्रेसवर टीका केली. तर, उद्धव ठाकरे यांच्याकडूनही त्यांनी काही अपेक्षा बाळगली आहे.
पुणे : 30 ऑगस्ट 2023 | वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची शिवसेनेसोबत ( उद्धव ठाकरे ) यांच्यासोबत युती असली तरी ते महाविकास आघाडीसोबत नाहीत. तर. देशातील प्रमुख पक्षांच्या इंडिया आघाडीमध्येही प्रकाश आंबेडकर यांना बोलविण्यात आले नाही. मुंबईमध्ये होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीचे प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आले नाही. यावरून प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसला खडे बोल सुनावले आहेत. तसेच, इंडिया आघाडीत उद्धव ठाकरे आमचे वकील आहेत असा टोलाही त्यांनी कॉंग्रेसला लगावला आहे.
काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना घेण्याचे सुतोवाच केले होते. त्यानंतर आंबेडकर यांनी ‘ना कबुतर, ना फोन’ अशी प्रतिक्रिया दिली होती. मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांना निमंत्रण देण्यात आले. मात्र, प्रकाश आंबेडकर यांना या बैठकीसाठी निमंत्रण देण्यात येईल अशी अपेक्षा असतानाही त्यांना डावलण्यात आले.
प्रकाश आंबेडकर यांनी यावर भाष्य करताना कॉंग्रेसवर टीका केली. आम्ही शिवसेनेबरोबर आहोत. २०१९ मध्ये आम्ही काँग्रेसला ऑफर दिली होती. आताही दिली आहे. पण, इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी आम्हाला निमंत्रण दिलं का नाही हे काँग्रेसला विचारा, असे ते म्हणाले.
मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आहे. मी काही महाविकास आघाडीमध्ये नाही. त्यामुळे माझी बांधिलकी ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. इंडिया आघाडीमध्ये शिवसेना आमच्या बाजूने बॅटिंग करेल अशी अपेक्षा आहे. मी महाविकास आघाडीमध्ये नाही त्यामुळे आम्हाला इंडियाचे आमंत्रण नाही. पण, उद्धव ठाकरे आमची वकिली करतील असे ते म्हणाले.
इंडिया आघाडीमध्ये जायचे की नाही हा नंतरचा प्रश्न आहे. पण, कॉंग्रेसने या बैठकीपासून आम्हाला लांब का ठेवले? यावर शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे असे ते म्हणाले. माजी खासदार राजू शेट्टी यांना या बैठकीला बोलावले आहे. ते जाणर की नाहीत हा त्यांचा प्रश्न आहे. त्यावर तेच अधिक सांगू शकतील असेही आंबेडकर म्हणाले.