प्रकाश आंबेडकर यांच्या 25 मागण्यांची लांबलचक यादी, इंडिया आघाडीसमोर मोठा पेच
प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष वंचित बहुजन आघाडीने अलीकडेच मुंबईत एका संयुक्त कार्यक्रमात महाविकास आघाडीसोबत युतीची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी आता आपल्या 25 मागण्या आघाडीसमोर ठेवल्या आहेत.
मुंबई | 8 फेब्रुवारी 2024 : आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच इंडिया आघाडीला अनेक धक्के बसले आहेत. छोट्या छोट्या घटक पक्षांनी इंडिया आघाडी पर्यायाने कॉंग्रेसला जागावाटपावरून घेरले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि कॉंग्रेसची महाविकास आघाडी आहे. या महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची एन्ट्री झाली आहे. मात्र, जागावाटप फॉर्म्युला निश्चित होण्यापूर्वीच आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला 25 मागण्यांची यादी सादर केली आहे अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
बिहारमध्ये नितीशकुमार यांनी भाजपसोबत नवी युती करून याआधी आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. तर, आता महाराष्ट्रातही महाआघाडीमधील प्रकाश आंबेडकर यांनी 25 मागण्यांची यादी सादर करून भारत आघाडीची डोकेदुखी वाढवली आहे. प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष वंचित बहुजन आघाडीने अलीकडेच मुंबईत एका संयुक्त कार्यक्रमात महाविकास आघाडीसोबत युतीची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी आता आपल्या 25 मागण्या आघाडीसमोर ठेवल्या आहेत.
आघाडीसोबतच्या पुढील बैठकीपूर्वी आपल्या मागण्या पूर्ण होतील असा विश्वास प्रकश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. जात जनगणनेव्यतिरिक्त ओबीसींसाठी लोकसभा आणि विधानसभेत राखीव जागा ठेवण्यात याव्या अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
सामाजिक न्याय, शेती, जमीन सुधारणा आदी मुद्द्यांचाही त्यांच्या मागण्यांमध्ये समावेश आहे. मराठ्यांसाठी वेगळा कोटा असावा. त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, अशी भूमिका त्यांनी याधीच स्पष्ट केली आहे. याशिवाय, जातीची जनगणना झाली पाहिजे. आम्ही ओबीसींनाही मतदान करू. संसद आणि विधानसभेसाठी आम्ही राखीव जागांची मागणी करतो असे त्यांनी म्हटले आहे.
राज्यातील पीक उत्पादन आणि शेतकऱ्यांच्या खर्चात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पाणी, वीज, खतांच्या किमतींवरही नियंत्रण ठेवण्यात यावे अशी मागणी आंबेडकर यांनी केलीय. महाविकास आघाडीने कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याबाबत आपली भूमिका करावी. हा कायदा शेतकरी विरोधी आहे. तसेच, कॉर्पोरेट फार्मिंग रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
लोकसभेच्या किती जागांवर सहमती?
महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 34 जागांवर महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांचे एकमत झाले आहे. तर, उर्वरित 14 जागांवर अद्याप निर्णय झालेला नाही. या उर्वरित जागांवरही पुढील बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. वर्धा, रामटेक, भिवंडी, हिंगोली, जालना, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि शिर्डी या जागांचा तिढा कायम आहे. यातील वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळणार असाही प्रश्न आहे.