प्रकाश आंबेडकर यांचा विधानसभा अध्यक्षांवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले, त्यांनी जावईशोध…
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे अकोल्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्र प्रकरणी केलेल्या निवाड्यावर आपले भाष्य केले आहे.
अकोला | 16 फेब्रुवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादीबाबतचा निकाल दिला आहे. नार्वेकर यांनी राष्ट्रवादी हा पक्ष अजित पवार यांचाच असल्याचं म्हटलं आहे. तसेच अजितदादा आणि शरद पवार गटाचे आमदार पात्र असल्याचंही म्हटलं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयानंतर शरद पवार गटात एकच खळबळ उडाली आहे. या निकालाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर, दुसरीकडे वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या निकालावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे.
प्रकाश आंबेडकर हे अकोल्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. पक्ष कुणाचा आणि काय करायचं याचा 10 व्या शेड्युलप्रमाणे अधिकार आहे, असा नवीन जावईशोध नार्वेकरांनी स्पीकर म्हणून काढला आहे. 10 शेड्युल प्रमाणे जे पक्षातून फुटतात त्या लोकांनी इतर पक्षात प्रवेश घेतला नाही तर त्यांना फक्त अपात्र करण्याचा अधिकार स्पीकरला आहे, असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलंय.
प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांना एक सल्ला दिला आहे. जरांगे पाटील यांनी त्यांचा लढा आता राजकीय केला पाहिजे, असं आंबेडकर यांनी म्हटलंय. कुणबी संदर्भातील मागणी पूर्ण झाल्याचं दिसत आहे. आता गरीब मराठा यांचा प्रश्न शिल्लक राहिलेला आहे. तो शिंदे आयोगावर अवलंबून आहे असं सरकार म्हणते. 20 तारखेला होणारा मसुदा काय आहे ? ते अजून सरकारने सांगितलं नाही. त्यामुळे त्यात गरीब मराठ्यांचा प्रश्न त्यात आहे की नाही हे कळायला मार्ग नाही. म्हणून येत्या 20 दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. 80 सालापासून मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढलेल्या वेगवेगळ्या संघटनांना निझामी मराठ्यांनी जिरवून टाकल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत जालन्यातून जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी असा सल्लाही आंबेडकरांनी यावेळी दिला आहे.
बौद्धिक चोरीचं काय?
नरेंद्र मोदी आर्थिक चोरी संदर्भात कारवाई करत आहेत. पण दुर्दैवाने जे बौद्धिक माहिती चोरतात त्यांच्या विरुद्ध कारवाई होताना दिसत नाही, असा आरोपही आंबेडकर यांनी केला आहे.