मुंबई : “गौरी, ज्या कारणाने तू आत्महत्येचा निर्णय घेतला असशील, त्याला शिक्षा नक्कीच मिळेल. अगदी कुणी रक्ताचं असलं तरी” असा विश्वास यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख (Prashant Gadakh) यांनी पहिल्यांदाच व्यक्त केला. प्रशांत गडाख यांची पत्नी आणि मंत्री शंकरराव गडाख यांची भावजय गौरी गडाख (Gauri Gadakh) यांनी दोन महिन्यांपूर्वी राहत्या घरी आत्महत्या केली होती. पत्नीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच जाहीररित्या भावना मांडताना प्रशांत गडाख यांनी ‘वर्तमान जगायचंय मला’ या आपल्या पहिल्या प्रकाशित कवितेचा उल्लेख केला आहे. इतरांना प्रेरणा देणारी कविता माझीच प्रेरणा होऊन बसली आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. प्रशांत गडाख यांच्या राजकीय प्रवेशाची ही नांदी असल्याचंही मानलं जात आहे. (Prashant Gadakh Poetry which helped him after Suicide of wife Gauri Gadakh)
काळ्या धुक्यात सूर्य दिसत नाही
पावसाचाही सुगंध येत नाही
उजेड शोधायचा कुठे?
त्याला मर्यादा आहेत इथे
भाषेलाही मर्यादा आहेत,
नक्कीच पांगुळगाडा दिसतो तिथे
मी उजळू पाहु इथे पण
समोर समाज थाटला आहे तिथे
मी जर व्यक्त झालो यांजसमोर
चिंधड्या उडतील इथे…
पण मी ठरवलंय आता
जगण्यापेक्षा लढण्याची परिभाषा…
अन्याय, ठेचा, जखमा
सुगंधी करायच्यात मला..
कारण मरणाऱ्यांपेक्ष्या लढणाऱ्यांची
जिद्द वाढवायची इथे मला..
जखमांना बंदिस्त करुन गाठोड्यात
बांधून फेकायचंय नदीत मला..
आणि मनसोक्त पोहायचंय तिथे
वेदनांची झुंड अखेरीस
नदीच्या प्रवाहातच वाहते
राख होऊनी तिथे
आता नको ही व्यथा..
वय झाले ही सांगून कथा
न समजे पुढील पिढ्या,
नको हे दुःख त्यांच्या पुढ्या
न सांगे उद्या फुटेल
एक अंकुर!
त्याचा वृक्ष होई नवा, तोच असेल पुढच्या पिढीचा ठेवा
ते भविष्य असेल,
आज भूत लिहितोय
आता रोज वर्तमान जगायचंय मला
आता वर्तमान जगायचंय मला
“एक दिवस रात्री दोन वाजता अचानक जाग आली. पुन्हा लवकर झोप येईना, म्हणून घराच्या मधल्या चौकात येऊन बसलो, एकटाच. समोरचा पेन उचलला आणि जे सुचलं ते कागदावर लिहिलं, एकटाकी. सकाळी जाग आली, तेंव्हा रात्रीचं लिहिणं विसरून गेलो होतो. बऱ्याच वेळानं आठवलं की, रात्री आपण काहीतरी लिहिलंय. पुन्हा पुन्हा वाचलं आणि संकोचानेच माझे साहित्यिक व कवी स्नेही अरुणजी शेवते आणि संजीव तनपुरे यांना पाठवलं. दोघांनाही ते खूपच आवडलं. तेव्हा कळालं, त्या रात्री आपल्याला चक्क कविता सुचली” अशा शब्दात प्रशांत गडाख यांनी कवितेची जन्मकथा सांगितली.
“माझ्या आयुष्यात घडलेल्या अत्यंत वेदनादायी प्रसंगात मला धीर देण्यासाठी, माझं सांत्वन करण्यासाठी, तुम्ही सगळे आला होतात. त्यात राजकीय विरोध असणारे पण वेदना जाणारेही होते. परंतु माझी मनस्थिती तेव्हा कुणालाही भेटण्याची नव्हती. त्याबद्दल सॉरी… माझी स्थिती तुम्ही नक्कीच समजून घ्याल. नियतीने माझ्या वाट्याला मरुस्तपर्यंत जे वेदनेचं गाठोड दिलं आहे, ते मला घेऊनच चालावं लागेल” अशा भावना प्रशांत गडाख यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.
‘वर्तमान जगायचंय मला’ ही माझी कविता जी इतरांना प्रेरणा होती, ती अशा रीतीने माझीच प्रेरणा होऊन बसेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. राजकारणात, समाजकारणात, स्वतःच्या आयुष्यात यश-अपयश, कठीण प्रसंग खूप आले. पण मी कधीही डगमगलो नाही. उलट त्यांना खंबीरपणे तोंड दिलं, लढलो… पण… गौरी तू मला हरवलं… माझा स्वभाव आलेल्या परिस्थितीशी लढण्याचा आहे, आता कुणाशी लढू… तू माझी पत्नी नव्हतीस, तर आई, बहीण, मैत्रीण सगळं काही होतीस, असं तूच मला म्हणायचीस ना.. तशीही तू मूडी होतीस, कधीकधी अचानक शांत राहायचीस. तू चेष्टेत मला म्हणायचीस की ‘तुमच्याआधी मीच जाणार’ पण तू अशी गेलीस की माझी आयुष्यभराची चेष्टा होऊन गेली” असं लिहित प्रशांत गडाखांनी आठवणीही जागवल्या आहेत.
“साहेबांची सगळ्यात आवडती सून नाही, तर तू मुलगी, आपल्या नेहल, दुर्वा आणि मी.. आमचं काय चुकलं गं.. रोज रात्री झोपताना असं तुझ्याशी भांडतो मी.. माझा आवाज पोहोचतो का गं तुझ्यापर्यंत.. मला कोणाचीही सहानुभूती नको आहे, पण एक नक्की की माझा नियतीवर भरवसा आहे. ज्या कारणाने तू हा निर्णय घेतला असशील, त्याला शिक्षा नक्कीच मिळेल. अगदी कुणी रक्ताचं असलं तरी.. हा मला आत्मविश्वास आहे.” असंही प्रशांत गडाख यांनी लिहिलं आहे. (Prashant Gadakh Poetry which helped him after Suicide of wife Gauri Gadakh)
“गौरी मी घरी नव्हतो, तू निष्प्राण.. आपल्या लहान मुलीने पाहिलं गं खिडकीतून.. गौरी, तुला मी नेहमी म्हणायचो की, मी आहे तुझ्यामागे. मी आता खरंच फकीर झालोय, पण मला माझ्यासमोर माझ्या मुली, माझे वडील, माझ्यावर अवलंबून हजारो संसार दिसतात. मित्रांनो मी जरी तुमच्यात आलो, तरी ही घटना मला एक दोन महिन्यात सावरु शकत नाही. प्लीज, माझी भावना तुम्ही समजून घ्याल. मी स्वतःहून ठामपणे सांगायचो की, मी राजकारणात येणार नाही, पण माझ्या पत्नीच्या निधनात काहींनी राजकारण आणण्याचा प्रयत्न केला, आता काळच ठरवेल की मी राजकारणात यायचं की नाही” अशा भावना प्रशांत गडाख यांनी व्यक्त केल्या आहेत.
“माझ्या जिवलगांनो, तुम्ही मला जे बळ दिलं ते मी माझ्या आयुष्यभर विसरु शकत नाही. कारण माझ्या आयुष्यात माझ्या दोन्ही मुली, माझे आई-वडील आणि तुम्ही सर्व जिवलग मित्र आहात. आपण भेटू, तेव्हा कृपा करुन माझं सांत्वन करु नका. न विसरता येणारी ती घटना मला निदान तुमच्यात असताना विसरायची आहे. जेव्हा भेटू तेव्हा तुमचे काम सांगा, समाजाची कामे सांगा, नवनिर्मितीची चर्चा करा. तुमच्याशी व्यक्त व्हावसं वाटलं म्हणून हात मोकळा झाला आणि माझं मनही…” अशा पद्धतीने गडाख यांनी आपल्या भावना शब्दबद्ध केल्या.
संबंधित बातम्या
गौरी गडाख यांची आत्महत्या गळफास घेऊनच, शवविच्छेदन अहवालावरुन स्पष्ट
गडाख कुटुंबाच्या कठीणकाळात शिवसेनेचा ‘तारणहार’ सरसावला, मिलिंद नार्वेकर सांत्वनासाठी नगरला
(Prashant Gadakh Poetry which helped him after Suicide of wife Gauri Gadakh)