मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर, न्यायालय नेमकं काय म्हणालं?
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

Prashant Koratkar Granted Bail: प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. कोरटकरला याआधी पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपमानास्पद विधान केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.
आधी पोलीस नंतर न्यायालयीन कोठडी
न्यायालयाच्या या निर्णयानंतर कोरटकरला एका प्रकारे दिलासाच मिळाला आहे. याआधी त्याला अटक केल्यानंतर अगोदर तीन दिवस आणि नंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याची न्यायालयीने कोठडीत रवानगी केली होती. कोरटकरने जामिनासाठी कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात अपील केले होते. याबाबत दोन दिवसांपूर्वी सुनावणी पार पडली होती. त्यानंतर आज न्यायालयाने या जामीन अर्जावरील निर्णय दिला आहे. सत्र न्यायालयाने कोरटकर याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकर आणि इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत यांची कथित कॉल रेकॉर्डिंग समोर आली होती. या कॉल रेकॉर्डिंगमध्ये प्रशांत कोरटकर याला बोलताना आक्षेपार्ह भाषेचा वापर करत होता. तसेच त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना अपमानास्पद शब्द वापरले होते. त्यानंतर ही कॉल रेकॉर्डिंग महाराष्ट्रभर व्हायरल झाली होती. या प्रकरणी कोरटकर याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जात होती. त्यासाठी काही ठिकाणी निदर्शनंही झाली होती. सध्या हा कोरटकर पोलिसांच्या ताब्यात असून आता त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
असीम सरोदे नेकं काय म्हणाले?
प्रशांत कोरटकर याच्यावर गुन्हा नोंदवताना त्याला जामीन मंजूर होईल, अशीच कलमं लावण्यात आली होती. तीन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा न होणारी कलमं लावण्यात आली आहेत. अशावेळी साधारणत: जामीन होत असतो. पण हा जामीन देताना न्यायालयाने कोणती कारणं लक्षात घेतली, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. केवळ कलमांचा आणि शिक्षेचा विचार करून प्रक्रियावादी पद्धतीने जामीन होणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. यात न्यायालयाची काहीही चूक नाही. पण कोरटकर आता साक्षीदार फोडणं, पुराव्यांवर दबाव आणणं, माहिती लपवणं अशा कामांत गुंतवला जाऊ शकतो. असे झाल्यास आम्ही त्याचा जामीन रद्द करण्याची मागणी करू, अशी प्रतिक्रिया असीम सरोदे यांनी दिली आहे.