नाशिकः नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. नेमक्या त्याच तारखांना विद्रोही संमेलन घेण्याची तयारी जोरात सुरू आहे. त्यामुळे अखिल भारतीय साहित्य संमेलनापुढे विद्रोही साहित्य संमेलनाची मैफल रंगण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. त्याच्या तारखा आज पालकमंत्री छगन भुजबळ जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र, याच संमेलनाच्या तारखांदिवशी नाशिकमध्ये विद्रोही साहित्य संमेलन घेण्याची तयारी जोरात सुरू आहे. त्यावर गुलाम शेख यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. बैठकीला स्वागताध्यक्ष शशी उन्हवणेसह राजू देसले, डॉ. अनिल सोनवणे, चंद्रकांत भालेराव, डॉ. भारत कारिया यांची उपस्थिती होती. यावेळी विद्रोही साहित्य संमेलनासाठी नाशिक मर्चंट बँकेत खाते उघडल्याचे सांगण्यात आले. संमलेनाच्या जागेत स्टॉल्स उभारणीसाठी तीन हजार रुपये शुल्क घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
संमेलनापूर्वीच वाद
नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या तारखांवरून निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्यात चांगलीच पत्रापत्री रंगली आहे. विशेष म्हणजे खोटे कारण देत संमेलन पुढे ढकलण्याला ठाले-पाटलांनी सणसणीत पत्र लिहून आक्षेप घेतला आहे. त्यामुळे संमेलनाच्या तारखा अचानक का बदलल्या, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. निमंत्रकांनी संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकरांच्या पत्नी मंगलाताईंच्या ऑपरेशनचे कारण देत संमेलन डिसेंबरमध्ये होणार असल्याचे साहित्य महामंडळाच्या परस्पर निश्चित केले होते. मात्र, चुकीचे कारण देत संमेलन पुढे ढकलण्याचा हा खोटेपणा ठाले-पाटील यांनी एक पत्र लिहून उघड केला. या पत्रात त्यांनी निमंत्रकांनाही खडेबोल सुनावले आहेत. त्यामुळे संमेलन कधी होणार, हा गुंता कायम आहे.
संमेलन स्थळालाही होतोय विरोध
साहित्य संमेलन पूर्वी नाशिकमधील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मैदानात घेण्याचे ठरले होते. हे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती आहे. मात्र, आता आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटीत (मेट) ते होणार असल्याचे समजते. हे स्थळ शहरापासून दूर आहे. येथे पाहुण्यांची राहण्याची व्यवस्था व्यवस्थित होईल, पण शहरातील सामान्य नागरिक तिथे खास संमेलनासाठी येतील का, अशी भीती व्यक्त केली जात आहे. जर रसिकांनी संमेलनाकडे पाठ फिरवली, तर पुस्तक विक्रीही कमी होईल. त्यामुळे शहरातच संमेलन भरवावे, असा सूर अनेक जण आळवत आहेत. याबाबत प्रकाशक आपली भूमिका अधिकृतपणे मांडण्याची शक्यता आहे.
इतर बातम्याः
दिल गार्डन गार्डन हो गया…गमाडी गंमत, नाशिकमध्ये साकारली फुलपाखरांची बाग!
मोठी बातमी, दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 3700 कोटी जमा होणार : विजय वडेट्टीवारhttps://t.co/tUR7reCeyz#UddhavThackeray | #VijayWadettiwar | #Nagpur | #Farmers
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2021