torrential rain : कोल्हापूर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजरी
दरम्यान जोरदार वाऱ्यासह काही वेळातच पाऊस सुरु झाल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. केवळ अर्धा तासच झालेल्या या पावसामुळे मात्र सर्वत्र ओलेचिंब झाले.
कोल्हापूर: उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूरच्या (Kolhapur) जनतेला आज अवकाळी पावसाने दिलासा दिला. आज सायंकाळी 5 च्या सुमारास वादळी वाऱ्यासह वीजांची कडकडीट आणि ढगांच्या गडगडाटात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हवेत गारवा पसरला. दरम्यान जोरदार वाऱ्यासह काही वेळातच पाऊस सुरु झाल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. केवळ अर्धा तासच झालेल्या या पावसामुळे मात्र सर्वत्र ओलेचिंब झाले. गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात असह्य उकाडा (heat) होता. त्यामुळे अंगाची होणारी ल्हाई यामुळे हैराण झाले होते. आज दुपारी अचानक वातावरणात गर्मी वाढत गेली आणि सायंकाळी 4 नंतर आकाशात ढगांनी घर करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या धुवाँधार पावसाने (torrential rain) शहर व परिसराला झोडपून काढले. दरम्यान महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाणाऱ्या इचलकरंजी शहरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार बॅटींग केली.
हवामान खात्याचा अंदाज
तर कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र, येणाऱ्या तीन ते चार तासांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला होता. तसेच साधारणपणे 30 ते 40 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहू शकतात असेही सांगण्यात आले होते. तसेच या कालावधीमध्ये जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी. शक्यतो प्रवास टाळावा आणि अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं. असं आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत सर्व नागरिकांना करण्यात आलं होतं. या कालावधीत विजा पडण्याची शक्यता ही वर्तविण्यात आली होती.
वीज पुरवठा खंडीत
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाल्याने विजपुरवठा खंडीत झाला होता. सुमारे शहर आणि परिसरातील वीजपुरवठा हा अर्ध्यातासाहून अधिक काळ खंडीत झाला होता.
शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
दरम्यान राज्यात आठ दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. तर कोल्हापुरात गेल्या चार-पाच दिवसांपासून पारा 39 अंशांवर पोहोचला होता. सायंकाळनंतर मात्र सुरुवातीला सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि त्यानंतर लगेच धुवाँधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला होता. तसेच ग्रामीण भागात ही पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. तर पावसाने सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.